तिघांवर कणगले येथे अंत्यसंस्कार
प्रतिनिधी /संकेश्वर
राष्ट्रीय महामार्गावर कारने थांबलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने रविवारी दुपारी बेनकनहोळीनजीक झालेल्या भीषण अपघातात संकेश्वर येथील डॉ. सचिन मुरगुडे यांची पत्नी आणि मुलगी जागीच ठार झाली होती. तर डॉ. सचिन हे गंभीर जखमी झाल्याने यांच्यावर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचाही सोमवारी पहाटे मृत्यू झाला. दरम्यान, सोमवारी सकाळी अपघातातील तिघा मृतांवर कणगले येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सदर घटना घडल्यामुळे संकेश्वर परिसरातील अनेक मान्यवरांनी मुरगुडे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. डॉ. सचिन व त्यांच्या पत्नी डॉ. श्वेता यांनी आपल्या सेवेतून तसेच अनेक सामाजिक उपक्रमांतून लोकांना जगण्याची दिशा दाखविली. मुरगुडे कुटुंबीयांवर अचानक कोसळलेला दुःखाचा डोंगर अनेक स्वकीयांसाठी दुःखदायक होता. डॉ. श्वेता व मुलगी सिया यांच्या अपघाती निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत असतानाच डॉक्टर सचिन यांचाही सोमवारी पहाटे मृत्यू झाला आहे.
या तिघांचेही मृतदेह सोमवारी दुपारी 12.30 च्या सुमारास मुरगुडे यांच्या कुटुंबीयांकडे देण्यात आले. तिघांवर कणगले येथील मुरगुडे यांच्या फार्मवर अंत्यसंस्कार केले. सिया शिकत असलेल्या शाळेने सोमवारी एक दिवसाचा दुखवटा पाळून सुटी दिली होती. सचिन यांच्या पश्चात आई व विवाहित बहीण असा परिवार आहे.









