प्रतिनिधी / म्हापसा
म्हापसा येथील एक समाजसेवक, सहकार रत्न, प्रसिद्ध डॉक्टर, ज्येष्ठ लायन, म्हापसा अर्बन बँक, बार्देश बाजारचे माजी संचालक, म्हापसा ग्राहक सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष, म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष, सातेरी देवस्थानचे माजी उपाध्यक्ष व उत्तर गोवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, अनेक सामाजिक कार्यातील अग्रणी डॉ. रामकृष्ण मोरजकर यांचे काल दि. 11 रोजी वृद्धापकाळामुळे निवासस्थानी निधन झाले. मृत्यू समयी ते 98 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पुत्र डॉ. धर्मानंद, स्नषा व तीन नातवंडे व विवाहित कन्या, जावई असा परिवार आहे. अंत्यसंस्कार दि. 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा. होईल. ते माजी आमदार काका पानकर यांचे साडू होत.
त्यांच्या निधनाची वार्ता कळताच माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप यांनी दुःख व्यक्त केले आहे. सहकार क्षेत्रात सदैव वावरणारे डॉ. मोरजकर यांच्या निधनाने सहकार तसेच सामाजिक क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. गोवा सहकार संघाने त्यांचा गौरव केला होता. डॉक्टर म्हणून कार्यरत असताना त्यांनी सेवाभावी वृत्तीने काम केले. 30 वर्षापूर्वी डॉ. मोरजकरांचे धर्मानंद हॉस्पिटल गरिबांचे उपचार केंद्र होते. अशा महान व्यक्तीस आम्ही मुकलो आहोत. अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.









