प्रतिनिधी/ बेळगाव
फॅमिली डॉक्टर म्हणून काम करताना रुग्णांच्या सुख-दु:खाचे साक्षीदार म्हणून काम करणे गरजेचे असते. हीच भूमिका कोरोनाकाळात जबाबदारीने पार पाडणारे डॉ. भूषण सुतार खऱया अर्थाने नावाप्रमाणे समाजभूषण ठरतात, असे उद्गार माजी महापौर विजय मोरे यांनी काढले.
कोरोनाच्या संकटात सतत कार्यरत राहून घरोघरी जाऊन रुग्णांची काळजी घेणाऱया डॉ. भूषण सुतार यांचा सन्मान शांताई वृद्धाश्रम आणि क्रिश फौंडेशन यांच्यातर्फे करण्यात आला. यावेळी मोरे बोलत होते. डॉ. भूषण हे नव्याने या क्षेत्रात येणाऱयांसाठी नक्कीच प्रेरणास्थान ठरतील, असेही ते म्हणाले.
क्रिश फौंडेशनचे अध्यक्ष, बांधकाम व्यावसायिक गोपाळराव कुकडोळकर यांच्या हस्ते शाल, भेटवस्तू आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. डॉ. भूषण सुतार यांनी कोरोनाकाळात अनेक गोरगरीब रुग्णांचे तारणहार म्हणून काम पाहिले आहे. डॉक्टर हा देव असतो, हे त्यांच्या रुपातून आणि कार्यातून पहायला मिळाले, असे ते म्हणाले.
गावोगावी जाऊन गरजू रुग्णांना औषध पुरवठा करणारे वसंत बालिगा यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. आश्रमाचे व्यवस्थापक नागेश चौगुले, रजत स्वामी, मारिया मोरे, रजत स्वामी व इतर संचालक यावेळी उपस्थित होते. महम्मद कुन्नीभावी यांनी आभार मानले.
पेशा निभावणे हे आपले कर्तव्य
आपला पेशा निभावणे हे आपले कर्तव्य आहे. मी माझे काम केले आहे. या कार्याची दखल घेऊन झालेला हा सत्कार आणखी बळ देणारा आहे, असे मनोगत डॉ. भूषण सुतार यांनी व्यक्त केले.









