सातारा / प्रतिनिधी :
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाची जिथे सुरुवात झाली ती शाळा, सातारानगरी खरंच भाग्यवंत आहे. या नगरीत त्यांच्या आठवणी अजून शाळेच्या रूपाने जतन होताना आमचं उर भरून येत आहे. आज डॉ. आंबेडकर यांचे विचार जगाला मार्गदर्शक असे आहेत, असे प्रतिपादन प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी केले.
प्रतापसिंह हायस्कूलमध्ये विध्यार्थी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण आयुक्त उबाळे, सामाजिक कार्यकर्ते पार्थ पोळके, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, मुख्याध्यापक सन्मती देशमाने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
समाज कल्याण आयुक्त उबाळे म्हणाले, डॉ. आंबेडकर हे शिकले नसते तर आज जे परिवर्तन झाले आहे, ते दिसले नसते. त्यांच्या शिक्षणामुळे समाज जागृत झाला. शिक्षणाच्या प्रवाहात सर्वसामान्य वर्ग आला. अगदी मी सुद्धा डॉ.बाबासाहेब यांच्यामुळे येथे उभा आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर म्हणाले, ज्या शाळेत डॉ.बाबासाहेब शिकले. ती शाळा म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे. या शाळेत विध्यार्थी दिवस कार्यक्रमाला हजर रहाण्याचा आमच्यासाठी दुग्ध शर्करा योग आहे. माध्यमिक शिक्षण विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य या शाळेला लाभेल, असे त्यांनी सांगितले.









