प्रतिनिधी / सातारा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण झाले त्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे शैक्षणिक सहकार्य घेणेबाबतचा ठराव जिल्हा परिषदेच्या दिनांक १२ जून २०२० च्या सर्वसाधारण सभेत संमत झाला होता. त्या अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेचे शैक्षणिक सहकार्य घेण्याबाबतची सहविचार सभा आज दिनांक ०२ जुलै २०२० रोजी स्थायी समितीच्या सभागृहात सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उदय कबुले यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
या सभेस जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, शिक्षण, अर्थ व क्रीडा समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला बाल कल्याण समिती सभापती सोनाली पोळ, समाज कल्याण समिती सभापती कल्पना खाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजीव नाईक निंबाळकर, दीपक पवार, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धमेंद्र काळोखे, कार्यकारी अभियंता युवराज लवटे, तसेच;, नव नियुक्त सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव संजय नागपुरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रभावती कोळेकर उपस्थित होते.
सर्व प्रथम जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील व सचिव विठ्ठल शिवणकर यांचे स्वागत करुन ते म्हणाले, प्रतापसिंह हायस्कूलला उर्जितावस्था आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन करुन रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्व शैक्षणिक उपक्रम सुरु करावेत.त्यासाठी आवश्यक ते शिक्षक प्रतिनियुक्तिवर घ्यावेत, रयत शिक्षण संस्थेमार्फत मार्गदर्शक समन्वयक नेमून त्यांच्याद्वारे शाळेच्या माध्यमातून जे समन्वयक नेमतील त्यांना सर्व प्रकारे शैक्षणिक सुधारणा अंमलबजावणी विषयक स्वातंत्र्य दिले जाईल, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील म्हणाले की, प्रातपसिंह हायस्कूलची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचे आव्हान आम्ही स्विकारले आहे. या हायस्कूलची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करु, त्यामध्ये प्रतापसिंह हायस्कूलमध्ये गुरुकुल प्रकल्प सुरु करणे, डिजीटल स्कूल, गणित-विज्ञान व भाषा प्रयोगशाळा सुरु करणे, शेती शाळा, शिक्षकांना अद्ययावत करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देणे, तसेच सयाजीराव हायस्कूल व कल्याणी हायस्कूल या ठिकाणी जे उपक्रम राबविले जातात, ते सर्व उपक्रम प्रतापसिंह हायस्कूलमध्ये राबविले जातील, असे सांगून येत्या ५ वर्षात प्रतापसिंह हायस्कूल हे सातारा शहरामध्ये अग्रमानांकित शाळा म्हणून नावारुपाला येण्यासाठी रयत शिक्षण संस्था सर्वतोपरीसहकार्य, असे आश्वासनही डॉ. पाटील यांनी यावेळी दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाची सुरुवात ज्या शाळेपासून झाली ती शाळा देशाच्या अस्मितेचा विषय आहे. राज्य शासनाने या शाळेच्या सुधारणेसाठी दोन वर्षापूर्वी ५० लाख दिले आहेत. नविन शालेय इमारत, मैदान इत्यादी सोई सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. जसे गाव दत्तक घेतले जाते, तशी प्रतापसिंह शाळा ‘रयत’ने दत्तक घ्यावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी सांगितले.
माजी अध्यक्ष संजीव नाईक निंबाळकर यांनी शाळा सुधारणेविषयी जिल्हा परिषद व रयत शिक्षण संस्था यांच्या मध्ये ‘सामंजस्य करार’ करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रतापसिंह हायस्कूलचे ऐतिहासिक महत्त्व विशद करुन सातारा जिल्हा परिषदेमार्फत प्रतापसिंह हायस्कूलला अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या असल्याचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी प्रास्ताविक प्रास्ताविकात सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








