केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे गौरवोद्गार, डॉ. प्रभाकर कोरे यांचा अमृतमहोत्सवी सोहळा
बेळगाव / प्रतिनिधी
राजकारण, समाजकारण, शिक्षण, आरोग्य, कृषी, सहकार इतक्मयाच क्षेत्रांपुरते डॉ. प्रभाकर कोरे मर्यादित नाहीत. कोणतेही क्षेत्र असो त्या क्षेत्रात प्रभाकर कोरे यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे कोरे हे एक विद्यापीठच आहे. संत बसवेश्वर यांनी सुधारणेचा दिलेला विचार केएलईसारख्या संस्था अंमलात आणत आहेत. डॉ. प्रभाकर कोरे यांच्यासारख्या शिक्षणतज्ञामुळे देश नक्कीच बलशाली होईल, असे गौरवोद्गार केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काढले.
केएलई संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांचा अमृत महोत्सवी सोहळा शनिवारी जिल्हा क्रीडांगणावर पार पडला. या कार्यक्रमात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. कोरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर केंद्रीय संसदीयमंत्री प्रल्हाद जोशी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, जगदीश शेट्टर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले, कर्नाटक, महाराष्ट्र या परिसरात डॉ. प्रभाकर कोरे यांनी मोठे काम केले आहे. वैद्यकीय क्षेत्रात होणारे जागतिक तंत्रज्ञान कोरे यांनी केएलईमध्ये आणले आहे. पै पै जोडून केएलई संस्था उभी केली असून, देशात एक अग्रगण्य संस्था म्हणून गणली जात आहे. कोरे यांना मिळालेला दुसरा जन्म हा त्यांनी समाजासाठी अर्पण करून केलेले काम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
केएलईमुळे गोव्यातील वैद्यकीय क्षेत्र समृद्ध झाले
गोवा व बेळगाव यांच्यामध्ये जवळचा संबंध आहे. गोवा मुक्ती संग्रामात बेळगावमधील लोकांनी केलेले काम उल्लेखनीय होते. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर शिक्षणासाठी कुठे जावे? असा प्रश्न नागरिकांसमोर होता, तेव्हा बेळगावमधील केएलई संस्थेने गोव्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. त्यामुळेच आज केएलई येथून शिकलेले बरेच विद्यार्थी गोव्यातील वैद्यकीय क्षेत्र समृद्ध करीत आहेत. डॉ. कोरे यांच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले नवभारताचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, मिळालेल्या प्रत्येक संधीचा उपयोग डॉ. प्रभाकर कोरे यांनी केला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणावर त्यांचा भर असल्याने संस्थेचा वटवृक्ष झाल्याचे त्यांनी नमूद केले. प्रल्हाद जोशी यांनी केएलई संस्था केवळ बेळगावपुरती मर्यादित न राहता महाराष्ट्र, दिल्ली व आता दुबई येथेही कार्यरत असल्याचे सांगितले. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कोरे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांची कामगिरी सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी असल्याचे सांगितले. आर. व्ही. देशपांडे यांनी केएलईच्या माध्यमातून कोरे यांनी क्रांती घडविल्याचे सांगितले. तर माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आपण केएलईमुळेच घडलो, असे नमूद केले.

शेतकऱयांच्या मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी माझी
सत्काराला उत्तर देताना डॉ. प्रभाकर कोरे यांनी केएलईच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. समाजाचा विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आल्यानंतर शिक्षण संस्था वाढविण्यास सुरुवात केली. आजवर केएलई हॉस्पिटलमध्ये लाखो लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. जागतिक दर्जाच्या सेवा या ठिकाणी दिल्या जातात. बेळगावसह गोकाक, चिकोडी, अंकोला व हुबळी येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांची सेवा करीत आहेत. ‘नीट’ परीक्षेमध्ये उत्तर कर्नाटकातील विद्यार्थी मागे पडत असून, मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन उत्तर कर्नाटकासाठी स्वतंत्र रँकिंग जाहीर करावे. शेतकऱयांच्या मुलांना मेडिकल, इंजिनियर, डेंटल या अभ्यासक्रमांना मोफत प्रवेश देण्याची जबाबदारी माझी असे कोरे यांनी सांगताच सर्वांनी टाळय़ांचा गडगडाट केला.
प्रारंभी बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी प्रास्ताविक करून डॉ. प्रभाकर कोरे व केएलई संस्थेची माहिती करून दिली. प्रा. बी. एस. गवीमठ यांच्या ‘अनन्य साधारण’ या डॉ. कोरे यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. डॉ. कोरे यांचा तुलाभार करून त्यांच्या वजनाइतकी पुस्तके सरकारी शाळेला भेट स्वरुपात देण्यात आली.
यावेळी पालकमंत्री गोविंद कारजोळ, शिक्षणमंत्री बी. सी. नागेश, उद्योगमंत्री मुरुगेश निराणी, मंत्री भैरती बसवराज, धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, खासदार मंगला अंगडी, इरण्णा कडाडी, आण्णासाहेब जोल्ले, सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, गोव्याचे खासदार विनय तेंडुलकर, आमदार अनिल बेनके, इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे, गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यासह इतर मान्यवर उपस्थित होते.









