- दाभोळकर हत्येला आठ वर्ष, अनिंसकडून निदर्शने
ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिचीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 8 वर्षे झाली. त्यानंतरही मुख्य सूत्रधारांचा शोध लागलेला नाही. त्याविरोधात पुण्यासह राज्यभरात विविध ठिकाणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शिवाजीनगर पुणे शाखा यांच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन रॅलीचे आयोजन केले होते.
यावेळी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी ‘फुले-शाहू-आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर….’ अशा घोषणा देत, दाभोलकरांच्या खुनातील सूत्रधाराला अटक झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी केली. तसेच विवेकवादी विचार मिटवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आम्ही विवेकवादी विचार रुजविण्यासाठी कायम कटिबद्ध राहणार आणि विवेकाचा आवाज बुलंद ठेवणार असे सांगत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
दाभोलकर यांच्यावर 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉकच्या वेळी अज्ञातांनी गोळय़ा झाडून त्यांची हत्या केली होती. त्यानंतर बराच काळ मारेकऱयांचा शोध लागला नाही. अखेर या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाने आपल्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. यानंतर संशयित आरोपींना अटक झाली. मात्र, 8 वर्षे उलटूनही या प्रकरणाचा खटला न्यायालयात उभा राहिलेला नसून, मुख्य सुत्रधार बाहेरच आहे. त्यामुळे तात्काळ हा खटला सुरू करुन आरोपींना शिक्षा करण्याची मागणी अंनिसकडून केली जात आहे.








