द ग्लोबल ह्युमन राइटस या आंतरराष्ट्रीय फाऊंडेशनकडून सन्मान
ओटवणे / प्रतिनिधी:
गेली दोन दशके लाखो रुपये खर्च करून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पदवीधर प्राथमिक शिक्षक डॉ चंद्रकांत तुकाराम सावंत यांना मध्यप्रदेश येथील द ग्लोबल ह्युमन राइटस या आंतरराष्ट्रीय फाऊंडेशनकडून शनिवारी राष्ट्रीय समाज रत्न सेवा पुरस्कार ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या १५२ व्या जयंतीचे औचित्य साधून या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. डॉ चंद्रकांत सावंत ओवळीये गावचे सुपुत्र असून ते आंबोलीत राहतात तर मठ प्राथमिक शाळा नं. २ मध्ये पदवीधर शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक अशा ६६ शाळांमधील ८६ विद्यार्थीनी आणि ५ माघ्यमिक हायस्कूल मधील २५ विद्यार्थीनी मिळून एकत्रित ७१ शाळांमधील १११ विद्यार्थीनी कायमस्वरूपी दत्तक घेत तीन लाख पन्नास हजार रुपये कायमस्वरूपी देणगी दिली. तसेच विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा उपक्रमांसाठी स्वतः पदरमोड करून लाखो रुपये खर्च केले आहेत. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, संशोधन अशा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देश विदेशातील निवडक अशा व्यक्ती व संस्था यांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. यावर्षी सुमारे १२०० संस्था व २००० समाजसेवा व्यक्तीमधून ११ जणांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. डॉ चंद्रकांत सावंत यांनी समाजहितासाठी केलेल्या सर्वोत्कृष्ट कार्याची दखल घेऊन द ग्लोबल ह्युमन राइटस या आंतरराष्ट्रीय फाऊंडेशनकडून त्यांना राष्ट्रीय समाज रत्न सेवा पुरस्कार २०२१ ने गौरविण्यात आले. सन्मानपत्र, मेडल व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार वितरण सोहळ्याला द ग्लोबल ह्युमन राइटस या आंतरराष्ट्रीय फाऊंडेशनचे व्हाइस चान्सलर (लंडन) डाॅ. हेमा रवीशंकर, राष्ट्रीय अध्यक्ष रवी के. एस. नारायण, मलेशियातील अध्यक्ष डाॅ. के आर अरूणाचलम, मुख्य कार्यक्रम आयोजक दिव्या कृष्णमूर्ती (श्रीलंका) आदी मान्यवर उपस्थित होते.









