14 रोजी निघणार वीरज्योती मिरवणूक :
प्रतिनिधी/ बेळगाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्याचा निर्णय रविवारी विविध दलित संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा भंग होऊ नये, याची काळजी घेत जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे रविवारी विविध दलित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी मल्लेश चौगुले, अर्जुन देमट्टी, मल्लेश कुरंगी, राहुल मेत्री, जीवन कुरणे, महादेव तळवार, सिद्धाप्पा कांबळे, संतोष कांबळे, सुधीर चौगुले, काळाप्पा रामचन्नावर, यल्लाप्पा कोलकार, सिद्राय मेत्री आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बसवराज रायवगोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी बोलताना मल्लेश चौगुले म्हणाले, 14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता सम्राट अशोक चौकापासून वीरज्योती मिरवणूक निघणार आहे. कसाई गल्ली, चव्हाट गल्ली, संगोळ्ळी रायण्णा सर्कल, चन्नम्मा सर्कलमार्गे ही मिरवणूक जाणार आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिरवणुकीचे स्वागत करण्यात येणार आहे. दुपारी कंग्राळ गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, काळी आमराई परिसरातही वीरज्योती मिरवणूक फिरणार आहे. मुख्य मिरवणुकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.









