प्रतिनिधी/ रत्नागिरी
अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकऱयांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावणे व स्वयंपूर्ण करण्यासाठी शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना हाती घेतली आहे. नवीन विहीर असो वा जुनी विहीर दुरूस्ती, शेततळय़ाचे प्लास्टीक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच आदी लाभ या योजनेतून रत्नागिरी जिल्हय़ातील शेतकऱयांना घेता येणार आहेत.
त्यासाठी शेतकऱयांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱयांनी महाडीबीटीपीच्या (mahadbtmahait.gov.in ) या संकेतस्थळावर दाखल ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे करण्यात आले. या योजनेअंतर्गत नवीन किंवा जुनी विहीर दुरुस्ती व शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण यापैकी एका योजनेचा पॅकेज स्वरूपात लाभ संबंधितांना देण्यात येतो. त्यासाठी योजनेचा लाभ घेणाऱया लाभार्थ्याकडून ऑनलाईन अर्ज मागवून घेतले जातात. विशेष घटक अथवा शासनाच्या कोणत्याही नवीन विहीर व जुनी विहीर दुरुस्ती या योजनेचा लाभ घेतला असेल, त्यांना लाभ मिळत नाही. ग्रामसभेने शिफारस केलेल्या शेतकऱयांनी संकेतस्थळावर अर्ज दाखल करावे. या योजनेतील कामांसाठी अनुदान लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यांवर देण्यात येतात. गटविकास अधिकाऱयांतर्फे प्रस्तावाची मूळ प्रत आवश्यक त्या कागदपत्रांसह कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करावी. योजनेचा कालावधी नवीन सिंचन विहीर पॅकेजसाठी 2 वर्षांचा असून इतर बाबीसाठी 1 वर्षाचा आहे.
अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा नवबौध्द शेतकरी असणे आवश्यक आहे. सक्षम प्राधिकऱयाने दिलेले जात प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. आधारकार्ड व आधारकार्डाशी संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. अर्जदार अपंग असल्यास सक्षम प्राधिकाऱयाचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न 1.50 लाख पर्यंत असलेचा 2019-20 चा उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. सोबत जमीन धारणेचा नवीन सातबारा व आठ अ उतारा, कृषी अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र, गटविकास अधिकारी यांचे शिफारस पत्र, यापूर्वी कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा आदी बाबींचा या योजनेच्या लाभार्थींसाठी समावेश आहे.









