प्रतिनिधी / बेळगाव
सध्या कोरोनाचा फैलाव सर्वत्र होत असल्याने नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागात टास्क फोर्स कमिटीच्या माध्यमातून ‘डॉक्टर गावाकडे चला’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कोरोनाबाधितांचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. योजनेचा शुभारंभ आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
बेळगुंदी आरोग्य केंद्र संचालित गणेशपूर येथील मराठी शाळेत तात्कालिक आरोग्य केंद सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी योजनेचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने गावोगावी जावून कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. या मोहिमेंतर्गत कोरोनाबाधितांच्या कुटुंबातील सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. ‘डॉक्टर गावाकडे चला’ योजनेच्या शुभारंभप्रसंगी आरोग्य खात्याच्या कामकाजाबाबत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी समाधान व्यक्त करून अधिकाऱयांचे कौतुक केले. कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱया कामाची माहिती आरोग्य केंद्राच्या जे. पी. खेमजी यांनी दिली. यावेळी जिल्हा पंचायतीचे कार्यदर्शी, तालुका पंचायत कार्यदर्शी, तहसीलदार, बेनकनहळ्ळी ग्रा. पं. अध्यक्ष, सदस्य व आरोग्य केंद्राचे अधिकारी उपस्थित होते.









