प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाविरोधात शहरातील संपूर्ण यंत्रणा लढत आहे. मात्र, यामध्ये हॉस्पिटल आणि डॉक्टरांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले होत आहेत. ही बाब अत्यंत निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते किरण जाधव यांनी व्यक्त केली आहे. याबाबत कर्नाटक मेडिकल सर्व्हिसेस कायद्यांतर्गत हल्लेखोरांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, एकीकडे कोविड योद्धय़ांसाठी टाळय़ा वाजविल्या जातात. मात्र, दुसरीकडे विसंगत असे विदारक चित्र दिसते आहे. कर्तव्यासाठी जिवाची पर्वा न करणाऱया कोविड योद्धय़ांवर हल्ले होणे ही दुर्दैवाची बाब आहे.
लोकांमध्ये प्रबोधन करण्याची गरज
सर्व यंत्रणा कोरोनाविरोधात लढत असताना हल्ले होऊ नयेत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकांमध्ये प्रबोधन करण्याची गरज आहे. कोरोनाची परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक आहे. डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे डॉक्टरांना संरक्षण देण्याची मागणी आम्ही पोलिसांकडे करत आहोत. कोविड रुग्णालयाला पोलिसांनी सुरक्षा दिली पाहिजे आणि डॉ. मिलिंद हलगेकर यांच्या हॉस्पिटलवर हल्ला करणाऱयांवर कारवाई केली पाहिजे.
अत्यंत गंभीर बाब : राहुल पाटील, पदाधिकारी अंनिस
देशावरील वैद्यकीय आणीबाणीच्याप्रसंगी सरकारच्या मार्गसूचीनुसार समाजाने स्वतःवर बंधने घालून प्रसंगी सामाजिक कार्य करण्याची गरज असताना आपले प्राण तळहातावर घेऊन काम करणाऱया डॉक्टर व कर्मचाऱयांवर हल्ला होणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो.
ज्यांच्याकडून उद्वेगाने ही घटना घडली, त्यांच्यावतीने यापूर्वीही आततायीपणामुळे घडलेल्या काही घटनांमुळे सरकारला मनस्ताप सहन करावा लागला. तेव्हा समस्त जनतेच्यावतीने त्यांनी डॉक्टरांची आणि सरकारची क्षमा मागणे भाग आहे. वैद्यकीय विभागाने उदार अंतःकरणाने जनतेला माफ करावे व सामान्य जनतेप्रती कार्यरत व्हावे. हॉस्पिटलच्या कर्मचाऱयांना धीर देऊन अधिक ऊर्जेने काम करण्यास उद्युक्त करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.









