आशियाई क्रीडा स्पर्धेचा विचार करून केला बदल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयटीएफने डेव्हिस चषक स्पर्धेच्या तारखात बदल करून ती अलीकडे घेतल्यामुळे भारताला आता आशियाई क्रीडा स्पर्धेतही अव्वल टेनिसपटूंना उतरवता येणार आहे. आधीच्या नियोजनानुसार आशियाई क्रीडा स्पर्धा व डेव्हिस चषक लढती जवळपास एकाच वेळी होणार होत्या. पण आता डेव्हिस चषक लढती आठ दिवस अलीकडे घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारतासह आशियातील अन्य देशांना त्याचा लाभ होणार आहे.
भारताची डेव्हिस चषक लढत नॉर्वेविरुद्ध त्यांच्याच देशात होणार असल्याचे अलीकडेच जाहीर करण्यात आले. ही लढत 16-17 किंवा 17-18 सप्टेंबर या कालावधीत तर आशियाई स्पर्धेतील टेनिस क्रीडा प्रकार 10 ते 14 सप्टेंबर या कालावधीत होणार होता. त्यामुळे भारताला आपला अव्वल संघ कोणत्यातरी एकाच स्पर्धेत खेळविता येणार होते. कारण चीनमधील हांगझोयू येथे अत्यंत कमी वेळेत नॉर्वेहून पोहोचणे प्रत्यक्षात फारच कठीण जाणार होते. त्यामुळे अखिल भारतीय टेनिस फेडरेशन (एआयटीए) व आशियाई टेनिस फेडरेशन (एटीएफ) यांनी आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनकडे (आयटीएफ) स्पर्धेच्या तारखात बदल करण्याची विनंती केली होती. आता सुधारित कार्यक्रमानुसार भारतासह 10 आशियाई देशांच्या डेव्हिस चषक लढती 14-15 सप्टेंबर रोजी होतील आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील टेनिस लढती 18-24 सप्टेंबर या कालावधीत खेळविल्या जातील.
‘दहा आशियाई देशांच्या विश्व गट एक व दोनमधील डेव्हिस चषक लढतींच्या तारखांत आयटीएफने बदल केला असल्याचे एटीएफने एआयटीएला कळविले आहे. त्यामुळे आता आशियाई टेनिस व डेव्हिस चषक यांच्या तारखांत क्लॅश होणार नाही,’ असे एआयटीएचे सरचिटणीस अनिल धुपर यांनी सांगितले. भारताची नॉर्वेविरुद्धची डेव्हिस लढत 14-15 सप्टेंबर रोजी होईल आणि एटीएफनेही आशियाई स्पर्धेतील टेनिस कार्यक्रमात सुधारणा केली असल्याने पुरेसा वेळ मिळणार आहे, असे धुपर पुढे म्हणाले. विश्व गट एकमध्ये भारतासह पाक, उझ्बेकिस्तान, जपान यांचा तर विश्व गट दोनमध्ये चीन, लेबनॉन, थायलंड, चिनी तैपेई, हाँगकाँग, इंडोनेशिया या आशियाई देशांचा समावेश आहे.









