ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून एकतर्फी विजय, हॅझलवूडचे 4 बळी
अबु धाबी / वृत्तसंस्था
डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 56 चेंडूत नाबाद 89 धावांची वादळी खेळी साकारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने विंडीजचा 8 गडी राखून धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीसाठी पोहोचण्याच्या आपल्या आशाअपेक्षा आणखी पल्लवित केल्या. डावखुऱया वॉर्नरने 4 षटकार व 9 चौकारांची आतषबाजी करताना विंडीजच्या गोलंदाजांची चौफेर धुलाई केली. या लढतीत विंडीजने 7 बाद 157 धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने वॉर्नरच्या वादळी खेळीमुळे 16.2 षटकात 2 बाद 161 धावांसह एकतर्फी विजय संपादन केला. डेव्हॉन ब्रेव्होसह ख्रिस गेलसाठी देखील ही विश्वचषक इतिहासातील शेवटची लढत ठरण्याची शक्यता आहे.
विजयासाठी 158 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नरला मिशेल मार्शची उत्तम साथ लाभली. मार्शने 32 चेंडूत 53 धावांची फटकेबाजी केली. त्याच्या खेळीत 5 चौकार, 2 षटकारांसह समावेश राहिला. या जोडीने 75 चेंडूत 124 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली.
तत्पूर्वी, विंडीजच्या डावात केरॉन पोलार्डने 31 चेंडूत 44 धावांचे योगदान दिले. शिमरॉन हेतमेयरने 27 तर इव्हिन लुईसने 29 धावा फटकावल्या. ऑस्ट्रेलियातर्फे जोश हॅझलवूडने 4 षटकात 39 धावात 4 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
विंडीज ः 20 षटकात 7 बाद 157 (केरॉन पोलार्ड 31 चेंडूत 44, इव्हिन लुईस 26 चेंडूत 29, हेतमेयर 27. हॅझलवूड 4-39, स्टार्क, कमिन्स, झाम्पा प्रत्येकी 1 बळी).
ऑस्ट्रेलिया ः 16.2 षटकात 2 बाद 161 (डेव्हिड वॉर्नर 56 चेंडूत 9 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 89, मिशेल मार्श 32 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 53. अकिल होसेन 1-29, ख्रिस गेल 1-7).
डेव्हॉन ब्रेव्हो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
विंडीजचा अष्टपैलू डेव्हॉन ब्रेव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. लंकेविरुद्ध पराभवानंतर विंडीजचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर ब्रेव्होने या विश्वचषकाअखेर आपण निवृत्त होत असल्याचे फेसबुक लाईव्ह शोवरुन जाहीर केले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने विंडीजतर्फे शेवटचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीत्व केले. ब्रेव्होने या लढतीत 4 षटकात 36 धावा दिल्या.
सीम-बॉलिंग ऑलराऊंडर ब्रेव्हो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अव्वल खेळाडूंपैकी एक राहिला असून त्याने विंडीजतर्फे 91 सामन्यात 78 बळी घेतले. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ग्रेनाडा स्टेडियमवर 19 धावात 4 बळी, अशी सर्वोच्च कामगिरी नोंदवली. 2 वेळा टी-20 विश्वचषक विजयाचा सदस्य राहिलेला ब्रेव्हो 1 हजारपेक्षा अधिक धावा जमवण्यात यशस्वी ठरला. त्याने 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.









