वृत्तसंस्था/ डब्लिन
आयर्लंडच्या पुरुष क्रिकेट संघाच्या अंतरिम प्रमुख प्रशिक्षकपदी डेव्हिड रिप्लीची तीन महिन्यांच्या कालावधीकरीता नियुक्ती करण्यात आली आहे. इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱया नॉर्दम्पटनशायर क्लबचे रिप्ली हे माजी क्रिकेटपटू आहेत.
आयर्लंड क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहॅम फोर्ड यांनी गेल्या आठवडय़ात आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, आयर्लंडच्या क्रिकेट मंडळाने तीन महिन्यांच्या कालावधीकरीता डेव्हिड रिप्ले यांची हंगामी प्रमुख प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. आयर्लंडचा संघ नजीकच्या काळात अमेरिका आणि विंडीजच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयात डेव्हिड रिप्ली संघाचे प्रशिक्षक राहतील. पुढील वषीच्या फेब्रुवारी महिन्यात आयसीसी टी-20 विश्वचषक पात्र फेरीची स्पर्धा होणार असून आयर्लंडचा संघ या स्पर्धेसाठी जोरदार तयारी करीत आहे.









