ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना विषाणूच्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटसाठी केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि लसीकरणाची गती वाढवण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. आठ राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये पंजाब, कर्नाटक, राजस्थान, आंध्रप्रदेश, गुजरात, जम्मू-काश्मीर, तामिळनाडूचा आणि हरियाणाचा समावेश आहे.
आतापर्यंत देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 51 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील सर्वाधिक म्हणजेच 22 रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. हा व्हेरिएंट अधिक संक्रमक असल्याने तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आठ राज्यातील दहा जिल्ह्यांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळतील तेथे तात्काळ कंटेन्मेंट झोन तयार करावेत. संक्रमितांचे नमुने तातडीने सार्स-सीओव्ही-टू जीनोमिक कंन्सोर्टियाच्या प्रयोगशाळेत पाठवावेत. तसेच लोकांच्या हलचालींवर निर्बंध लावावेत, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.









