मुंबई \ ऑनलाईन टीम
देशात कोरोना पाठोपाठ आता डेल्टा प्लस या नवीन आजाराने डोकं वर काढलं आहे. या नवीन आजारामुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण झाले असून, चिंतेचे वातावरण आहे. या संदर्भात आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या क्षणाला डेल्टा प्लसच्या संदर्भात अधिक चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, डेल्टा प्लसच्या संदर्भात दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण साधारण १०० नमूने घेतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये दर आठवड्याला २५ नमूने घेतो आणि अशा पद्धतीने प्रती महिना आपण डेल्टा प्लसच्या सॅम्पलचं होल जीनोम सिक्वेन्सिंग करतो. हे होल जीनोम सिक्वेन्सिंग आजपर्यंत जे ४ हजार लोकांचं झालं, त्यामध्ये २१ लोक डेल्टा प्लस पॉझिटव्ह आढळले. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, परंतु उर्वरती सर्वजण बरे होऊ घरी परतले आहेत. त्यामुळे एकदम चिंता करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.
राजेश टोपे पुढे म्हणाले की, डेल्टा प्लसच्या गुणधर्माविषयी अद्यापही स्पष्टता आलेली नाही. वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात, परंतु आपल्या हाती असलेल्या सध्याच्या आकडेवारीच्या माहितीप्रमाणे निश्चतच जो एक मृत्यू झालेला आहे. तो केवळ डेल्टा प्लसमुळेच झाला, असं म्हणता येणार नाही. त्यामध्ये ८० वर्ष वय, अन्य आजार होते हे देखील कारणीभूत घटक आहेत. डेल्टा प्लसच्या संदर्भात एकूण देशभरात ४८ केसेस आहेत. त्यामुळे या क्षणाला डेल्टा प्लसच्या संदर्भात अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपण सध्या करोना नियमांचे पालन करून वागावं, एवढीच माझी सूचना राहील.
Previous Articleमराठा आरक्षणाची सर्व जबाबदारी राज्य शासनाची – चंद्रकांत पाटील
Next Article फॅशन उद्योगामध्ये तेजी








