सिंधुदुर्गला दिलासा : महिन्यापूर्वी केली होती कोरोना चाचणी : रुग्ण पूर्णपणे बरा
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्गात कणकवली परबवाडी येथे आढळलेला डेल्टा प्लसचा रुग्ण पूर्णपणे बरा होऊन कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकांच्या काळजीपोटी परबवाडी परिसरातील नागरिकांचे कोरोना टेस्टिंग सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी केले आहे.
राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस या प्रकारातील 21 रुग्ण सापडले. त्यात कणकवली परबवाडी येथे डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर जिल्हय़ात खळबळ उडाली होती. डेल्टा प्लस या प्रकारातील विषाणू हा अतिशय त्रासदायक आणि वेगाने पसरणारा असतो. त्यामुळे काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोग्य विभागानेही अलर्ट होत तात्काळ परबवाडी येथे कंटेन्मेंट झोन घोषित करून सर्व्हे सुरू केला होता.
डेल्टा प्लस बाधित रुग्ण मंगळवारी सापडल्यानंतर दुसऱया दिवशी बुधवारी त्या रुग्णाविषयी अधिक माहिती जाणून घेतली असता मुंबईच्या आरोग्य संशोधन केंद्राच्या कर्मचाऱयांमार्फत जिल्हय़ात काही लोकांचे मे महिन्यामध्ये नमुने घेतले होते. त्याचा अहवाल आता जाहीर करण्यात आला आहे. कणकवली परबवाडी येथे आढळलेला डेल्टा प्लस रुग्णाचा नमुना 21 मे रोजी घेण्यात आला होता. त्यानंतर आता एक महिना पूर्ण झाला असल्याची माहिती डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.
तसेच तो रुग्ण मे महिन्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हा रुग्णालयात आठ दिवस दाखल होता. जिल्हा रुग्णालयात आठ दिवसातच बरा होऊन घरी परतला होता. आताही तो बरा आहे. तो रुग्ण कोरोनामुक्त झालेला असून त्याची तब्येत एकदम ठणठणीत आहे. त्यामुळे कुणी घाबरून जाऊ नये, असे डॉ. कांबळे यांनी म्हटले आहे.
डेल्टा प्लस बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाला असला, तरी आणि त्याचे नमुने घेऊन एक महिना झाला असला, तरी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कणकवली परबवाडी परिसरातील नागरिकांचे कोरोना टेस्टिंग सुरू करण्यात आले असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे यांनी केले आहे.
दरम्यान या रुग्णाला ट्रव्हल हिस्ट्री नसल्याने डेल्टा प्लस या विषाणूची कुठून लागण झाली, हे समजत नाही. त्यामुळे त्याबाबत संशोधन सुरू असून तो रुग्ण बरा झाला असला, तरी त्याच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्यात येऊन कोरोना टेस्टिंग करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.









