30 देशांमध्ये आतापर्यंत फैलाव
वृत्तसंस्था / लिमा
पेरूमध्ये सापडलेला कोरोना विषाणूचा लॅम्बडा व्हेरियंट जगातील विविध देशांमध्ये फैलावत आहे. या व्हेरियंटने ब्रिटनसमवेत अनेक देशांमध्ये शिरकाव केला आहे. भारतात आढळून आलेल्या डेल्टा व्हेरियंटपेक्षाही हा घातक असू शकतो अशी भीती तज्ञांना आहे. पण डाटाच्या आधारावर अशी कुठलीच पुष्टी झालेली नाही.
डेल्टा व्हेरियंटने अद्याप देखील भारतासह जगातील अनेक देशांमध्ये मोठय़ा प्रमाणावर संक्रमण फैलावले आहे. लसीच्या याच्यावरील प्रभावावरून विविध प्रकारचे अध्ययन अहवाल समोर येत आहेत. फायजर लसीचा प्रभाव इस्रायलमध्ये कमी होत 64 टक्क्यांवर आल्याचे इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने अलिकडेच म्हटले आहे. ही घसरण इस्रायलमध्ये डेल्टा व्हेरियंटच्या फैलावासोबत दिसून आली आहे.
नवा आकडा 6 जून ते 3 जुलैदरम्यानचा आहे. 2 मे ते 5 जूनदरम्यान याच लसीचा प्रभाव 94.3 टक्के आढळून आला होता. याचदरम्यान लॅम्बडा व्हेरियंट आल्याने चिंता अधिकच वाढली आहे. विशेषकरून या कोरोना व्हेरियंटमध्ये ‘असाधारण पद्धती’चे म्युटेशन आहे.
कोरोनाच्या लॅम्बडा व्हेरियंटमध्ये असाधारण म्युटेशन दिसून आले आहे. या व्हेरियंटला प्रारंभी सी.37 नाव देण्यात आले होते. ब्रिटनमध्येही या व्हेरियंटचे 6 रुग्ण सापडले आहेत. डिसेंबर महिन्यात या व्हेरियंटचा सर्वप्रथम शोध लागला होता. तेव्हा 200 पैकी केवळ एका रुग्णात याचे संक्रमण दिसून यायचे अशी माहिती पेरूमधील मोलेक्यूलर बायोलॉजीचे डॉक्टर पाब्लो त्सूकयामा यांनी दिली आहे.
पेरूमधील लॅम्बडा व्हरियंटच्या फैलावावरून शेजारी देश चिलीही सुटलेला नाही. चिलीमध्ये एक तृतीयांश रुग्ण याच व्हेरियंटचे आहेत. हा व्हेरियंट इतरांच्या तुलनेत अधिक आक्रमक असल्याच्या निष्कर्षावर अद्याप अनेक तज्ञ सहमत नाहीत. या व्हेरियंटच्या वेगाने फैलावावर संशोधन करण्यात यावे असे त्यांचे म्हणणे आहे. भारतात अद्याप लॅम्बडा व्हेरियंटच्या फैलावाचे कुठलेच पुरावे सापडलेले नाहीत. भारतात सध्या डेल्टा व्हेरियंट सर्वाधिक प्रभावी कोरोना व्हेरियंट आहे.









