रोहतक/प्रतिनिधी
डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह सध्या हरियाणामधील रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरुंगामध्ये कैद आहे. परंतु राम रहीमच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या राम रहीमला न्यायालयाने आणखी एका प्रकरणात दोषी ठरवलंय आहे. रणजीत सिंहच्या हत्येसाठी राम रहीम आणि इतर पाच आरोपींना पंचकुला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. रणजीत सिंहची २००२ मध्ये हत्या करण्यात आली होती. मृत रणजीत सिंह हा डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमचा समर्थक होता आणि १० जुलै २००२ रोजी त्याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयने ३ डिसेंबर २००३ रोजी रणजीत सिंह हत्या प्रकरणात एफआयआर नोंदवला होता. तर, रणजीत सिंहचा मुलगा जगसीर सिंह याने न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती.
या आठवड्याच्या सुरुवातीला, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने गुरमीत राम रहीम सिंग यांच्याविरोधातील खुनाचा खटला पंचकुलाच्या सीबीआय न्यायालयातून इतर कोणत्याही सीबीआय न्यायालयात हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. आता पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने गुरमीत राम रहीम सिंग आणि इतर पाच आरोपींना आयपीसीच्या कलम ३०२ अंतर्गत हत्येचे दोषी ठरवले आहे. याप्रकरणी १२ ऑक्टोबरला शिक्षा सुनावली जाणार आहे.
डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह सध्या हरियाणामधील रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरुंगामध्ये कैद आहे. दोन साध्वींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुरुमीत राम रहिमला २०१८ साली २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून सुनारिया तुरुंगात तो शिक्षा भोगत आहे.