अवमानाप्रकरणी आरोपी डेरा अनुयायांच्या सुरक्षेत वाढ : नामचर्चा घरांबाहेर पोलीस तैनात
वृत्तसंस्था / चंदीगड
पंजाबच्या मुक्तसर जिल्हय़ातील भूंदड गावात डेरा सच्चा सौदाचा अनुयायी चरणदासच्या हत्येनंतर राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. चरणदासच्या हत्येनंतर डेरा सच्चा सौदाच्या वादग्रस्त अनुयायांच्या घरांबाहेर पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. कोटकपूरा, फरीदकोट आणि भटिंडामध्ये पोलीस अधिक सतर्क आहेत. याच भागांमध्ये डेरा सच्चा सौदावरून बहुतांश वाद होत राहिले ओत.
चरणदासच्या हत्येला 16 तास उलटून गेल्यावरही कुणीच हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पोलिसांनाही मारेकऱयांचा कुठलाच सुगावा लागलेला नाही. शनिवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
2015 मधील धर्मग्रंथ अवमानाप्रकरणी आरोपी असणारे आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्या जीवाला धोका असल्याने या सर्वांच्या घराबाहेर पोलीस पहारा देत आहेत. त्यांना पूर्वीच सुरक्षा पुरविण्यात आली होती, जी आता वाढविण्यात आली आहे. पोलिसांकडून पंजाबमधील सर्व नामचर्चा घरांबाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनीच या बंदोबस्ताचा आढावा घेतला आहे.
डेरा प्रेमींच्या आतापर्यत झालेल्या हत्या
-13 जून 2016 रोजी बुर्ज जवाहर सिंह वालाचा डेरा प्रेमी गुरदेव सिंहवर दोन युवकांनी गोळीबार केला. गुरदेव सिंहचा 5 दिवसांनी रुग्णालयात मृत्यू
-22 जून 2019 रोजी नाभाच्या तुरुंगात कैद डेरा प्रेमी महिंदरपाल सिंह बिट्टूचा दोन अन्य कैद्यांनी लोखंडी सळीने जीव घेतला होता.
-20 नोव्हेंबर 2020 रोजी भटिंडामध्ये दुकानात बसलेल्या डेरा प्रेमीची दोन बाइकस्वार युवकांनी गोळय़ा घालून हत्या केली होती.
-3 डिसेंबर 2021 रोजी चरणदासची दुकानात घुसून दोन युवकांनी गोळय़ा झाडून हत्या केली.









