ओडेन्स, डेन्मार्क : सात महिन्यांच्या ब्रेकनंतर बॅडमिंटनला डेन्मार्क ओपन सुपर 750 स्पर्धेने पुन्हा सुरुवात होणार असून सायना नेहवाल व किदाम्बी श्रीकांत यांना बऱयापैकी चांगला ड्रॉ मिळाला आहे.
ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सायना व श्रीकांत जास्तीत जास्त रँकिंग गुण मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. 750,000 डॉलर्स बक्षीस रकमेची ही स्पर्धा 13 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपनंतर होणारी ही पहिलीच आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आहे. या स्पर्धेत श्रीकांतची सलामीची लढत इंग्लंडच्या टॉमी पेन्टीशी होणार असून दुसऱया फेरीत कदाचित भारताच्याच शुभांकर डेशी त्याची लढत होण्याची शक्यता आहे.
शुभांकरचा पहिला सामना कॅनडाच्या जेसन अँथनी हो शुई याच्याशी होणार आहे. जागतिक क्रमवारीत 14 व्या स्थानावर असणाऱया श्रीकांतने 2017 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. त्याने दोन सामने जिंकल्यास उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ तैवानच्या द्वितीय मानांकित चाऊ तिएन चेन याच्याशी पडण्याची शक्यता आहे.
जागतिक 20 व्या मानांकित सायनाची सलामीची लढत फ्रान्सच्या येले होयॉशी होणार आहे. ही लढत जिंकल्यास दुसऱया फेरीत डेन्मार्कच्या सातव्या मानांकित मिया ब्लिचफेल्टशी तिची गाठ पडू शकते. हा अडथळा तिने पार केला तर कॅनडाच्या चौथ्या मानांकित मिशेली ली हिच्याशी तिची गाठ पडण्याची अपेक्षा आहे. याशिवाय पारुपल्ली कश्यपची पहिली लढत जपानच्या कोकी वाटानबेशी होईल. यात यश मिळाल्यास त्याला जागतिक अग्रमानांकित केन्टे मोमोटाशी दुसऱया फेरीत लढावे लागणार आहे. लक्ष्य सेनचा फ्रान्सच्या ख्रिस्टो पोपोव्हशी सलामीचा मुकाबला होणार आहे.









