हल्लेखोराकडून अंदाधूंद गोळीबार ः 4 जण जखमी
वृत्तसंस्था/ कोपनहेगन
डेन्मार्कच्या कोपनहेगन शहरात एका शॉपिंग मॉलमध्ये रविवारी रात्री उशिरा गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात 3 जण मारले गेले आहेत. तर 4 जण जखमी झाले असून यातील 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. या हल्ल्याप्रकण्री एका 22 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे.
गोळीबाराच्या घटनेला प्रथम दहशतवादी हल्ला मानले जात होते. परंतु प्राथमिक चौकशीनंतर कोपनहेगन पोलीस ऑपरेशन युनिटचे प्रमुख सोरेन थॉम्सन यांनी ही दहशतवादी घटना नसल्याचे सांगितले. मृतामंध्ये 47 वर्षीय रशियन नागरिकाचा समावेश असल्याचे सांगत थॉम्सन यांनी याप्रकरणी चौकशी केली जात असल्याचे म्हटले आहे.

फिल्ड्स शॉपिंग मॉलमध्ये मोठय़ा संख्येत लोक पोहोचले असताना ही घटना घडली आहे. मॉलमध्ये अचानक गोळीबार आणि आरडाओरड सुरू झाली होती. यामुळे चेंगराचेंगरी सदृश स्थिती निर्माण होत लोक बाहेरच्या दिशेने पळू लागले. हल्ल्यात अनेक जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींची अचूक संख्या सध्या सांगणे घाईचे ठरणार असल्याचे पोलीस प्रमुखांनी म्हटले आहे.
पोलिसांनी या घटनेप्रकरणी एका 22 वर्षीय युवकाला अटक केली आहे. ही घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. डेन्मार्क जगातील सर्वात सुरक्षित आणि गुन्हेगारीचे प्रमाण सर्वात कमी असणाऱया देशांपैकी एक मानला जातो.
हॅरी स्टाइलचा कॉन्सर्ट
ब्रिटिश पॉप स्टार हॅरी स्टाइल हा मॉलनजीक रॉयल अरीनामध्ये कॉन्सर्ट करणार होता. रॉयल अरीना हे घटनास्थळापासून नजीकच आहे. त्याच्या कॉन्सर्टपूर्वी हा गोळीबार झाला आहे. हॅरी स्टाइलच्या कॉन्सर्टची सर्व तिकीटे विकली गेली होती.









