सूचना करूनही दुर्लक्ष केल्याने कारवाई : आठ दिवसांत समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन
प्रतिनिधी /बेळगाव
शिवाजीनगर परिसरात असलेल्या मिठाई भट्टीचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत आहे. येथील सांडपाणी डेनेजवाहिनीला जोडण्यात आल्याने डेनेज तुंबण्याची समस्या निर्माण होत आहे. याबाबत सातत्याने सूचना करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने मंगळवारी येथील रहिवाशांनी मिठाई भट्टीला टाळे ठोकण्याची कारवाई केली. मात्र आठ दिवसांत समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर टाळे खोलण्यात आले.
शिवाजीनगर येथे मिठाई बनविण्याची भट्टी असून भट्टीतील सांडपाणी डेनेजवाहिनीला जोडण्यात आले आहे. भट्टीमधील भांडी व साहित्य स्वच्छ केल्यानंतर सांडपाणी व मैदा डेनेजवाहिनीमध्ये अडकून रहातो. परिणामी डेनेजवाहिनी तुंबून सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. याबाबत नागरिकांनी भट्टी चालकांकडे अनेकवेळा तक्रार केली. तसेच येथील भट्टी अन्यत्र स्थलांतर करावी, अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. मात्र महापालिकेच्या अधिकाऱयांनी याबाबत कोणतीच कारवाई केली नाही. भट्टीतून सोडण्यात येणारे सांडपाणी आणि धुराचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत आहे.
सातत्याने सूचना करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने येथील महिला वर्गांनी मंगळवारी मिठाई भट्टीला भेट दिली. व पाहणी केली असता भट्टीमध्ये स्वच्छता नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भट्टीला टाळे ठोकून स्थलांतर करण्याची मागणी केली. आठ दिवसांत स्थलांतर करण्याच्यादृष्टीने कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन भट्टी चालकांनी दिल्यानंतर टाळे खोलण्यात आले. यावेळी परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते.









