वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बिस्कीटाच्या क्षेत्रात आजही मुलांच्या ओठावर असणाऱया पार्लेजी कंपनीला आता दूध व्यवसायात उतरायचे वेध लागले आहेत. सदरची कंपनी आता डेअरी उत्पादनात उतरणार असल्याचे समजते.
20 वर्षाच्या कालावधीनंतर पार्ले ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड नव्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेत आहे. अमूल, नेस्ले आणि आयटीसी यांना स्पर्धा करण्यासाठी कंपनी रणनिती आखणार आहे. मुंबईच्या या कंपनीने मागच्या महिन्यात स्मूद हे 85 एमएलचे उत्पादन 10 रुपयात सादर केले आहे. सदरच्या उत्पादनाला शहरी आणि ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे कंपनीच्या मुख्य विपणन अधिकारी नादिया चौहान यांनी सांगितले आहे. डेअरी उत्पादनांची बाजारपेठ मोठी असून याठिकाणी मोठी संधी आपल्याला आहे. आजवर जी म्हणून डेअरी पेय उत्पादने (फ्लेवर्ड मिल्कसारखी )आली आहेत त्यात किंमत हा घटक अडथळय़ाचा ठरत आला आहे. 200 मिलीलिटरच्या सर्व प्रकारच्या फ्लेवर्ड मिल्क गटात डेअरी उत्पादनांची किंमत 20, 25 व 30 रुपये अशी आहे. आयटीसीच्या सनफिस्ट व हर्शे चॉकलेट मिल्क शेकची (180एमएल) किंमत 35 रुपये आहे तर अमुल त्याकरीता 20 रुपये आकारते. पार्ले ऍग्रोची आर्थिक वर्ष 2020 मध्ये 7 हजार कोटींची उलाढाल राहिली आहे. स्मूद उत्पादनासाठी म्हैसूर व सितारगंज येथे 100 कोटी रुपये कंपनीने गुंतवले आहेत. याशिवाय कोणतेही उत्पादन बाजारात येण्याआधी त्याकरीताच्या जाहिरातीसाठी 30 ते 40 कोटी रुपये खर्च केला असल्याची माहितीही नादिया चौहान यांनी दिली आहे.









