दात तुटल्यास किंवा दाताची खूप झीज होऊन कळा येत असतील अथवा दात किंवा दाढेला रूट कॅनॉल ट्रीटमेंटनंतर संरक्षणाची गरज असेल तर कॅप किंवा क्राऊन बसवण्याचा सल्ला दंतवैद्यक देत असतात.
- कॅप बसविताना दात कोठपर्यंत किडला किंवा तुटला आहे हे संबंधित दाताचा एक्स-रे डेंटल क्लिनिकमध्ये घेऊन तपासले जाते आणि त्यानुसार कॅप बसविण्याचा निर्णय घेतला जातो.
- दाताची कीड मुळापर्यंत गेली असेल किंवा दाताचा/दाढेचा भाग तुटून नस उघडी पडली असेल तर प्रथम रूट कॅनॉल ट्रीटमेंट करून कॅप बसवली जाते.
- कीड किंवा तुटलेली व्याप्ती डेंटीन या भागापर्यंत सीमित असेल तर कॅप बसवितात. कॅप बसविताण्यापूर्वी दात वा दाढ सर्व बाजूंनी एअर रोटर मशिनच्या साह्याने कोरून त्याचे माप घेतले जाते. या प्रक्रियेदरम्यान होणार्या कळा सहन होत नसतील, तर रुग्णाला दातापुरती भूल दिली जाते. माप घेतल्यानंतर त्याचे मॉडेल बनवून डेंटल मेकॅनिककडे कॅप बनविण्यासाठी पाठविले जाते.
- दंतशास्त्रात कॅप बनविण्यासाठी वेगवेगळी मटेरिअल्स उपलब्ध आहेत. ज्यांना सोनेरी रंगाचे दात आवडतात ते गोल्ड (सोनेरी) धातूचे दात बनवावयास सांगतात.
- चांदीचे (निकेल-क्रोमिअम) अगदीच दातासारखे दिसणारे सिरॅमिक, मेटल फ्री सिरॅमिकचे दात असे प्रकार असतात. हिरडीवर दाताचा भाग अगदी कमी असेल तर त्यावरही मुळातून आधार घेऊन दात पूर्ववत तयार करता येतो. लॅबमधून कॅप बनवून आल्यानंतर एक प्रकारच्या सिमेंटच्या साह्याने डेंटल क्लिनिकमध्ये संबंधित दात किंवा दाढेवर घट्ट बसविली जाते.
- कॅप बसविल्यानंतर एक तास-अन्न -पाणी घ्यावयाचे नाही. 24 तासांपर्यंत पातळ अन्न घ्यावे. यानंतरही चिक्कीसारखे कठीण पदार्थ खाऊ नका. एवढी काळजी जर घेतली तर दीर्घ काळ कॅप दाढेवर अथवा दातावर टिकून राहतात आणि पूर्ववत खाण्यासाठी, दिसण्यासाठी त्याचा वापर होतो.
- काही कारणास्तव कॅप निघाल्यास ती आहे तशी डेंटिस्टकडे नेऊन परत बनविता येते.
– डॉ. निखिल देशमुख