वृत्तसंस्था/ नवी मुंबई
नवा कर्णधार फॅफ डु प्लेसिस व दिनेश कार्तिक यांच्या तुफान फटकेबाजीमुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने आपल्या पहिल्या सामन्यात 20 षटकांत 2 बाद 205 धावा फटकावत पंजाब किंग्सला 206 धावांचे कठीण आव्हान दिले. डु प्लेसिसने 88 धावा झोडपल्या.
डु प्लेसिसने पंजाबच्या गोलंदाजांवर हल्ला चढवित 57 चेंडूत 3 चौकार, 7 षटकारांसह 88 धावा तडकावल्या तर माजी कर्णधार विराट कोहलीने 29 चेंडूत नाबाद 41 धावांचे योगदान दिले. याशिवाय यष्टिरक्षक दिनेश कार्तिकनेही अखेरच्या टप्प्यात 14 चेंडूत नाबाद 32 धावा फटकावल्या. अनुज रावतने (21) कर्णधारासमवेत 50 धावांची सलामी दिल्यानंतर डु प्लेसिस व कोहली यांनी दुसऱया गडय़ासाठी 118 धावांची भर घातली. अर्शदीपने टाकलेल्या डावातील दुसऱया षटकात 11 अवांतर धावा आरसीबीला मिळाल्या. सातव्या षटकांत राहुल चहरने रावतला त्रिफळाचीत केले. कोहलीने सावध सुरुवात केल्यानंतर दहाव्या षटकात त्याने पहिला षटकार मारला. या षटकात आरसीबीने 13 धावा वसूल केल्या.
डु प्लेसिसने मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर लाभ घेत पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. स्मिथच्या एका षटकात त्याने एक चौकार, दोन षटकार ठोकले. त्यानंतर हरप्रीत ब्रारच्या षटकातही दोन षटकार मारले. कोहलीनेही आपल्या खेळीत 1 चौकार, 2 षटकार ठोकले. 18 व्या षटकात डु प्लेसिस बाद झाल्यानंतर कार्तिकने 14 चेंडूत 3 षटकार, 3 चौकारांसह 32 धावा तडकावत संघाला दोनशेचा टप्पा गाठून दिला.
संक्षिप्त धावफलक ः आरसीबी 20 षटकांत 2 बाद 205 ः डु प्लेसिस 88 (57 चेंडूत 3 चौकार, 7 षटकार), अनुज रावत 21 (20 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), कोहली नाबाद 41 (29 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), दिनेश कार्तिक नाबाद 32 (14 चेंडूत 3 चौकार, 3 षटकार), अवांतर 23. गोलंदाजी ः अर्शदीप सिंग 1-31, राहुल चहर 1-22.









