मागील आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या ‘तानाजी’ या चित्रपटाने या नव्या वर्षातील पहिला सुपरहिट चित्रपट दिला. या चित्रपटाच्या थ्रीडी करामतीने चित्रपट अधिक प्रभावी बनविला आहे. त्या पाठोपाठ आता झालेल्या डुलिटल या इंग्रजीतून हिंदीमध्ये आलेल्या डुलिटल चित्रपटाचेही आकर्षण बाल युवा वर्गाला आहे. यामधून मनोरंजनाचा नवा खजिना गवसला आहे.
विशेष म्हणजे हा चित्रपटदेखील थ्रीडी मधून सामोरा आल्याने रसिकप्रिय ठरण्याची चिन्हे आहेत. बेळगावातील प्रकाश चित्रपटगृहात तीन खेळांसाठी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. कार्टुन्स हा बालगोपाळांच्या आवडीचा आणि जिव्हाळय़ाचा विषय. या विषयामधून आलेले असंख्य चित्रपट हे बालरसिकांना भावतात. विशेषतः गोरीला हा बालचमू आणि युवावर्गाच्याही आवडीचा विषय. त्यामुळे या गोरीला प्राण्याच्या केंद्रस्थानी ठेवून बनणारे चित्रपट नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरतात. तशाच धाटणीचा हा डुलिटल चित्रपट आहे. त्यामुळे बालचमूच्या मनोरंजनाचा हा खजिना भेटीसाठी आला आहे.
सध्या अनेक कार्टुन चॅनल्सवर अनेक लोकप्रिय मालिकांचा बहर आलेला दिसतो. आपल्या अनेक करामतींमधून बालचमूंची मने जिंकणारी कार्टून्स पात्रे हे एक वेगळे विश्व आहे. छोटा भीम असो किंवा टॉम ऍन्ड जेरी असो, बालचमूंसाठी ही एक पर्वणीच असते. तशातच थ्रीडी म्हटलं की पहिलावहिला छोटा चेतनदेखील आठवतो. त्यामुळे या थ्रीडीपटाचे स्वागत बालचमूंकडून निश्चितच होईल, असे मानण्यास हरकत नाही. त्यामुळे समाधानकारक व्यवसायाचे गणित जमविण्यातही चित्रपटाला यश मिळेल, असे मानण्यास जागा आहे.
उपेंद्र बाजीकर









