माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाचे आयुक्तांना निवेदन
प्रतिनिधी / कोल्हापूर
डी.वाय.पी.सिटी या मिळकतीचे मालक संजय डी पाटील व सतेज पाटील यांनी हेतू पुरस्सर घरफाळा आकारणी तक्त्यास खुद्द मालक वापर अशी नोंद करुन चुकीच्या पध्दतीने घरफाळा आकारणी केली आहे. यामुळे कोट्यावधी रुपयांचा घरफाळा बुडवला असून महापालिकेने प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहून घरफाळा वसूल करावा. अन्यथा रस्त्यावरच्या लढाईसह न्यायालयात जाण्याचा इशारा माजी खासदार व भाजपाचे प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी दिला.आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांना याबाबतचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, पुणे बेंगलोर रोडवरील सि.स.नं 2104 / 15 याठिकाणी डी.वाय.पी. सिटी मॉल हे कमर्शिअल संकुल व सयाजी हॉटेल विकसित केले आहे. या संकुलातील वेगवेगळे दुकान गाळे, शॉपिंग मॉल, सिनेमागृह, कमर्शिअल हॉल, फूड स्टॉल, हे विकसित क्षेत्र सर्व भाडे तत्वावर मॅकडॉनल, शॉपर्स स्टॉप, पी.बी.आर सयाजी हॉटेल ग्रुप यांना भाडेतत्वार देण्यात आले आहे. याबाबत 30 पेक्षा अधिक नोंदणीकृत भाडे करार नोंदणवण्यात आले आहेत.डी.वाय.पी.सिटी मॉल मिळकतीचे मालक संजय डी.पाटील व पालकमंत्री सतेज पाटील यांनी हेतू पुरस्सर घरफाळा आकारणी तक्त्यास खुद्द मालक वापर अशी नोंद करुन चुकीच्या पध्दतीने घरफाळा आकारणी केली आहे.यामुळे कोट्यावधी रुपयांचा घरफाळा बुडवला असून महापालिकेने या प्रकरणाची जाग्यावर जावून शहानिशा करुन घरफाळा वसूल करावा.
यावेळी धनंजय महाडिक म्हणाले, महापालिकेने त्यांच्याशी दोनवेळा पत्रव्यवहार केला. पण त्यांनी माहिती दिली नाही. या प्रकरणी त्यांच्यावर अजून कोणतीही कारवाई झाली नसून वस्तुस्थिती तपासून योग्य कारवाई करावी अशी भाजप – ताराराणी आघाडीची मागणी असल्याचे सांगितले. कसबा बावडा येथील ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क लिजवर देण्यात आले होते. या मिळकतीला सुध्दा वार्षिक साडेतीन लाखाचा घरफाळा आहे. पण तो भरला नाही. तसेच ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्कचा करार या महिन्यात संपत असल्याने महापालिकेने त्याचा ताबा घेण्याची मागणी सुनिल कदम यांनी केली. महापालिकेने घरफाळा वसूल केला नाही तर रस्त्यावरच्या लढाईसह न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.
आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी याबाबत योग्य ती कारवाई करुन घरफाळा वसूल करण्याची ग्वाही दिली. यावेळी सत्यजित कदम,विजय सूर्यवंशी, किरण नकाते, माजी स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, माजी नगरसेवक महेश वासुदेव, संग्राम निकम, इंद्रजित जाधव, संजय निकम उपस्थित होते.
चौथ्या मजल्यावर हेलिकॉप्टरने म्हशी सोडायच्या का ?
माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, आदर्शा भीमा वस्त्रम या कपड्याच्या मॉलमध्ये चौथ्या मजल्यावर कागदोपत्री म्हशीचा गोठा दाखवला असल्याचा आरोप पालकमंत्र्यांच्या समर्थकांकडून करण्यात आला आहे. हे शक्य आहे का अशी विचारणा करत महापालिकेने त्याची शहानिशा करावी. तसेच त्यांनी केलेला आरोप हास्यास्पद असून चौथ्या मजल्यावर हेलिकॉप्टरने म्हशी सोडायच्या का अशी टिपणी केली.









