प्रतिनिधी / असळज
‘ पावसाचे आगार ‘ म्हणून ओळखल्या जाणा-या गगनबावडा तालुक्यातील काही भागात दरवर्षी पुराच्या पाण्याचा सामना करावा लागतो. पुरांमुळे तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटतो. आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी आता पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कारखान्याकडून गगनबावडा तहसिल प्रशासनाकडे आवश्यक त्या सर्व साहित्यासह दोन यांत्रिक बोटी प्रदान करण्यात आल्या. पालकमंत्री व कारखान्याचे चेअरमन सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हा समारंभ कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला. यावेळी गगनबावडा तहसिलदार संगमेश कोडे यांच्याकडे या दोन बोटी सुपूर्त करण्यात आल्या.
गेल्या काही वर्षात तालुक्यात पावसाळयात उद्भवणारी पूरस्थिती व संपर्कहीन होणारी गावे लक्षात घेता तेथील जनतेची व प्रशासनाची गैरसोय होत होती. आपत्कालीन स्थितीत जनतेला मोठया गैरसोयीचा सामना करावा लागत होता. शासनाकडून तालुक्यात मर्यादित यांत्रिक बोटी उपलब्ध असल्याने जनतेची होणारी गैरसोय विचारात घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी कारखान्याच्यावतीने गगनबावडा महसूल प्रशासनाकडे आवश्यक त्या सर्व साहित्यासह दोन यांत्रिक बोटी उपलब्ध करून दिल्या. यामुळे तालुक्यातील पूरग्रस्त भागाची आपत्कालीन स्थितीत होणारी गैरसोय टळणार आहे. या समारंभास जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, कारखान्याचे संचालक आदि उपस्थित होते.
Previous Articleकोल्हापूर : स्वातंत्र्यदिनी स्वच्छता कर्मचाऱ्यांसह नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी केले ध्वजारोहण
Next Article देशवासियांना मिळणार आरोग्य ओळखपत्र









