नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात हल्ला करण्याचा कट डी-गँगने आखल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानंतर शनिवारी देशात विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केलेल्या कारवाईदरम्यान अनेक जणांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. तसेच झडतीदरम्यान विविध कागदपत्रे, डिजिटल उपकरणे, सिमकार्ड आणि डिजिटल स्टोरेज उपकरणे जप्त केली आहेत. डी-गँगचा म्होरक्मया आणि भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊदने भारतात हल्ले करण्यासाठी एक विशेष युनिट तयार केल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर सुरक्षा दलाला सतर्क करण्यात आले आहे. देशातील राजकीय नेते आणि सेलिब्रिटी डी-गँगच्या टार्गेटवर असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम पुन्हा सक्रिय झाला असून भारतात हल्ले करण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे. दाऊद इब्राहिम भारतात घातपात घडवण्याच्या तयारीत असून त्याने एक विशेष टीम तयार केली आहे. ही टीम भारतातील महत्त्वाचे राजकीय नेते, प्रमुख उद्योजक यांना लक्ष्य करणार असल्याचे उघड झाले आहे. या हल्ल्यांच्या केंद्रस्थानी दिल्ली आणि मुंबई ही दोन मुख्य शहरे असल्याचा दावाही केला जात आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने आपल्या एफआयआरमध्ये या कटाचा उल्लेख केला आहे.
हिंसाचाराला खतपाणी घालण्याचा हेतू
एनआयएने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, दाऊदला त्याच्या विशेष युनिटच्या माध्यमातून भारतात हल्ले करायचे आहेत आणि त्याचे लक्ष दिल्ली आणि मुंबईवरच अधिक आहे. स्फोटक आणि प्राणघातक शस्त्रांनी सज्ज असलेल्या या युनिटच्या माध्यमातून दाऊदला भारतातील अनेक भागात हल्ले करायचे आहेत. भारताच्या विविध भागात हिंसाचार भडकावण्याचा या हल्ल्यांचा उद्देश आहे.
दाऊदचा भाऊ इकबाल कासकर ईडीच्या ताब्यात
दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याला एनआयएच्या खुलाशाच्या एक दिवस आधी शुक्रवारी ईडीने ताब्यात घेतले आहे. मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ईडीचे अधिकारी इकबालची पुढील 7 दिवस म्हणजे 24 फेब्रुवारीपर्यंत चौकशी करतील. ईडीने अलीकडेच दाऊद आणि त्याच्या जवळच्या साथीदारांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवला जात असल्याचा संशय ईडीला आहे. एका बिल्डरने केलेल्या तक्रारीनंतर यासंबंधी अधिक चौकशी केली जात आहे.
एनआयएच्या छाप्यांमध्ये 28 संशयित जाळय़ात
दहशतवादी कट हाणून पाडण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी देशाच्या अनेक भागात छापे टाकले. एनआयएच्या विविध पथकांनी शनिवारी जम्मू-काश्मीर आणि राजस्थानमधील आठ ठिकाणी छापे टाकले. या दोन राज्यांमधील सोपोर, कुपवाडा, शोपियान, राजौरी, बडगाम, गंदरबल आणि जोधपूर जिल्हय़ांमध्ये शोधमोहीम राबविण्यात आल्याचे तपास सूत्रांनी सांगितले. एनआयएने टाकलेले छापे हे बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन, अल बद्र, द रेझिस्टन्स प्रंट आणि पीपल अगेन्स्ट फॅसिस्ट फोर्सेससारख्या अनेक दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत. एनआयएने याप्रकरणी आतापर्यंत 28 जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहा दहशतवाद्यांना अटक
जम्मू-काश्मीरमध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे ओव्हरग्राउंड कामगार म्हणून काम करणाऱया एकूण दहा जणांना अटक करण्यात आली. हे मॉडय़ूल तरुणांची भरती करणे, निधीची व्यवस्था करणे, दक्षिण आणि मध्य काश्मीरमध्ये शस्त्रास्त्रांची वाहतूक करणे यासह इतर मदतीसाठी सक्रिय असल्याचे पोलिसांनी सांगितले. यासंबंधीच्या तपासादरम्यान तपास यंत्रणेने मोबाईल, सिमकार्ड आणि एक पिस्तूलही जप्त केले होते.









