वृत्तसंस्था / जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचा कर्णधार क्विंटॉन डि कॉक याची क्रिकेट दक्षिण आफ्रिकेतर्फे 2019-20 सालातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने पुरस्कार वितरणाचा हा वार्षिक समारंभ ऑनलाईन पद्धतीने पार पाडला.
27 वषीय डि कॉक याची 2019-20 सालातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणूनही निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे सलामीची महिला क्रिकेटपटू लॉरा उलव्हेडेट हिची चालू वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू तसेच सर्वोत्तम वन डे महिला क्रिकेटपटू म्हणून निवड केली. वेगवान गोलंदाज निगेडी याची चालू वर्षातील सर्वोत्तम वन डे आणि टी-20 प्रकारातील क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. भारताविरुद्ध कसोटी पदार्पण करणारा ऍनरिच नोर्जे याची चालू वर्षातील सर्वोत्तम नवोदित क्रिकेटपटू म्हणून निवड केली. त्याचप्रमाणे महिलांच्या विभागात टी-20 प्रकारात शबनीम इस्माईल हिची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून निवड क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने केली आहे. डि कॉकने 2017 साली सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूचा बहुमान मिळविला होता. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या कॅलिसने 2004 आणि 2011 साली एन्टिनीने 2005 आणि 2006 साली, हाशिम आमलाने 2010 आणि 2013 साली, डिव्हिलियर्सने 2014 आणि 2015 साली, रबाडाने 2016 आणि 2018 साली क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचा सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूचा बहुमान मिळविला होता. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेतर्फे 2004 साली असे पुरस्कार देण्यास प्रारंभ झाला होता. 2007 साली शॉन पोलॉकने, 2008 साली डेल स्टिनने, 2009 साली ग्रीम स्मिथने, 2012 साली फिलँडरने तर 2019 साली डु प्लेसीसने हा पुरस्कार मिळविला होता.









