वृत्तसंस्था/ सेंट लुसिया
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीवर दक्षिण आफ्रिकेने खेळाच्या दुसऱया दिवशी आपली पकड अधिक मजबूत केली आहे. डी कॉकच्या नाबाद शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने यजमान विंडीजवर पहिल्या डावात 225 धावांची भक्कम आघाडी मिळविली आहे. डी कॉकने 170 चेंडूत 7 षटकार, 12 चौकारांच्या मदतीने नाबाद 141 धावा झळकविल्या. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 322 धावा केल्यानंतर विंडीजने दिवसअखेर दुसऱया डावात 4 बाद 82 धावा जमविल्या आहेत. विंडीजचा संघ मोठय़ा पराभवाच्या छायेत असून ते अद्याप 143 धावांनी पिछाडीवर आहेत.
या कसोटीत यजमान विंडीजचा पहिला डाव केवळ 97 धावांत आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 4 बाद 128 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली. डी कॉकने शानदार आक्रमक फलंदाजी करत कसोटीतील आपले सहावे शतक झळकविले. जवळपास दोन वर्षानंतर त्याचे पहिले शतक आहे. व्हॅन डेर डय़ुसेनने 5 चौकारासह 46 धावा जमविल्या. मुल्डेरने 4 चौकारासह 25 धावांचे योगदान देताना डी कॉकसमवेत सहाव्या गडय़ासाठी 53 धावांची भर घातली.
डी कॉकने 257 मिनिटे खेळपट्टीवर राहून 170 चेंडूत 7 षटकार, 12 चौकारासह नाबाद 141 धावा जमविल्याने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 322 धावापर्यंत मजल मारता आली. दक्षिण आफ्रिकेच्या मार्करेमने 7 चौकारासह 60 धावा जमविल्या. 96.5 षटकात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 322 धावावर संपुष्टात आला. विंडीजतर्फे अष्टपैलू जेसॉन होल्डरने 75 धावात 4 तर कसोटी पदार्पण करणाऱया 19 वर्षीय सिलसने 75 धावात 3 गडी बाद केले. रॉशने 2 तर कॉर्नवलने 1 बळी घेतला.
225 धावांनी पिछाडीवर असलेल्या विंडीज संघाच्या दुसऱया डावालाही डळमळीत सुरुवात झाली. कर्णधार क्रेग ब्रेथवेट डावातील पाचव्या षटकात रबाडाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 7 धावा जमविल्या. रबाडाने विंडीजला आणखी एक धक्का देताना किरेन पॉवेलला 14 धावावर पायचीत केले. नॉर्जेने शाय हॉपला 12 धावावर झेलबाद केले. नॉर्जेने मेयर्सलाही मुल्डेरकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 12 धावा जमविल्या. विंडीजची स्थिती यावेळी 4 बाद 51 अशी केविलवाणी झाली होती. दिवसअखेर चेस 2 चौकारासह 21 तर ब्लॅकवूड 1 चौकारासह 10 धावावर खेळत होते. दक्षिण आफ्रिकेतर्फे रबाडा आणि नॉर्जे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले आहेत.
संक्षिप्त धावफलक ः
विंडीज प. डाव सर्वबाद 97, दक्षिण आफ्रिका प. डाव 96.5 षटकात सर्वबाद 322 (डी कॉक नाबाद 141, मार्करेम 60, व्हॅन डेर डय़ुसेन 46, मुल्डेर 25, पीटरसन 19, होल्डर 4-75, सिलस 3-75, रॉच 2-64), विंडीज दु. डाव 30 षटकात 4 बाद 82 (ब्रेथवेट 7, पॉवेल 14, हॉप 12, चेस खेळत आहे 21, मेयर्स 12, ब्लॅकवूड खेळत आहे 10, रबाडा आणि नॉर्जे प्रत्येकी दोन बळी).









