ऑनलाइन टीम / पुणे :
ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे एक दिवसीय राज्यस्तरीय राष्ट्रीय मूल्यांकन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय मूल्यांकन प्रक्रिये संदर्भात (एनबीए) महाराष्ट्र राज्यातील ३५ महाविद्यालयातून आलेल्या १८३ प्राचार्य व प्राध्यापकांशी संवाद साधत राष्ट्रीय मूल्यांकनाबाबतच्या विविध पैलूंवर तज्ञांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत ईएसआयसी मूल्यांकन उपाध्यक्ष डॉ. डी. एन. रेड्डी, आय. आय. टी. मंडी आणि आय. आय. टी.गांधीनगर च्या कमिटीचे सदस्य डॉ. एस. सी. सहस्रबुद्धे आणि वर्धमान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक व सीईओ डॉ. के. मल्लिकार्जुन बाबू, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सागर उल्हास ढोले पाटील, कॉलेजचे प्राचार्य डॉ. निहार वाळिंबे व सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
सागर उल्हास ढोले पाटील म्हणाले, प्रत्येक अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वत:च्या शिक्षण पद्धतीत कालानुरूप योग्य ते बदल करावे लागतात. एकविसावे शतक स्पर्धेेचे असून इंजिनीअरिंगमध्ये गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी प्राध्यापकांना शिकविण्याच्या पद्धतीत सुसंगत बदल करणे आवश्यक आहे. हे बदल समजून घेण्यासाठी आणि जगाच्या पावलांसोबत आपली पावले मिळविण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांना स्वत:च्या शैक्षणिक संस्थेत योग्य ते बदल करणे गरजेचे आहे. याबाबत सदर एकदिवसीय (एनबीए) राष्ट्रीय मूल्यांकन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
अनुभवी व तज्ज्ञ मान्यवरांनी राष्ट्रीय मूल्यांकन प्रक्रियेबाबतच्या विविध पैलूंवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रा. प्रांजली कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.









