उचवडे क्रॉसवरील जळीतकांडाला 11 वर्षे पूर्ण : सीआयडीकडे प्रकरण सोपवूनही तपास अपुराच
रमेश हिरेमठ /बेळगाव
एखाद्या किचकट गुन्हेगारी प्रकरणाचा तपास लावणे स्थानिक पोलिसांना शक्मय झाले नाही तर अशी प्रकरणे सीआयडीकडे सोपविली जातात. मात्र, सीआयडीलाही प्रत्येक प्रकरणात यश मिळतेच असे नाही. एका बेळगाव शहरातील अनेक प्रकरणे सीआयडीकडे पडून आहेत. काही प्रकरणांचा तपास अर्धवट तर काही प्रकरणांचा उलगडाच झाला नाही.
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात दहा वर्षांपूर्वी घडलेल्या एका खळबळजनक खून प्रकरणाचा तपास त्याचवेळी सीआयडीकडे सोपविण्यात आला. सीआयडीच्या अधिकाऱयांनी या प्रकरणाचे गूढ उकलण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. या प्रयत्नात त्यांना यशही आले. जवळजवळ तपास पूर्णत्वाला पोहोचला असे वाटत असतानाच तो कोणत्या कारणाने अद्याप अपूर्ण राहिला, हे समजायला वाव नाही.
रविवार दि. 4 डिसेंबर 2011 रोजी बेळगाव-जांबोटी रोडवरील उचवडे क्रॉसजवळ एक बोलेरो पेटवून दिल्याचे उघडकीस आले. बेळगाव ग्रामीणचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बोलेरो पिकअप वाहन आगीत भस्मसात झाले होते. चालकाच्या सीटशेजारी कोळसा झालेला एक मृतदेह आढळून आला. हे वाहन कोणाचे? मृतदेह कोणाचा? यासंबंधी कसलीच माहिती उपलब्ध झाली नाही.
संपूर्ण वाहन जळाले तर जवळच संगणकावर त्या वाहनाचा क्रमांक टाईप केलेला कागद आढळून आला. तो कागद अर्धवट जळालेला होता. संगणकावर काढलेल्या प्रिंटआऊटवर टीएन-69, एच 8985 असा क्रमांक लिहिलेला होता. संपूर्ण वाहनच जळून खाक झालेले असताना अर्धवट जळालेल्या कागदावर वाहनाचा क्रमांक मिळाला याचाच अर्थ कोणाला तरी तो क्रमांक पोलिसांना सुचवायचा असाच होतो.
शनिवार दि. 3 डिसेंबर 2011 रोजी रात्री काही स्थानिक नागरिकांनी उचवडे क्रॉसवरील डोंगरावर आगीचे लोळ पाहिले होते. या मार्गावर रात्रीची वर्दळ कमी असते. म्हणून निर्जन प्रदेशात खुनाच्या योजनेला मूर्त स्वरुप देण्यात आले होते. दुसऱया दिवशी रविवारी सकाळी बेळगाव ग्रामीणच्या तत्कालिन पोलीस उपअधीक्षक डॉ. अश्विनी, मंडल पोलीस निरीक्षक संतोष सतनाईक, उपनिरीक्षक सुरेश शिंगे आदी अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी वाहनातून अद्याप धूर येत होता.
बहाद्दरवाडी येथील कल्लाप्पा शिवराम नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालिन जिल्हा पोलीसप्रमुख संदीप पाटील यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सतत पाठपुरावा केला. कोळसा झालेल्या मृतदेहाच्या अवशेषातून डीएनए मिळविण्यात आला. आता घटनास्थळावर मिळालेल्या प्रिंटआऊटवरील वाहन क्रमांकावरून हे वाहन कोणाचे? याची माहिती मिळवायची होती. बिम्समधील विधीविज्ञान तज्ञ डॉ. गुरुदत्त व त्यांच्या सहकाऱयांनी मृतदेह एखाद्या स्त्राrचा आहे की पुरुषाचा? हे तपासण्याचे काम हाती घेतले. अखेर कोळसा झालेला मृतदेह पुरुषाचा असल्याचे उघडकीस आले.
तपास सुरू असतानाच या प्रकरणाचे मूळ धारवाड येथे असल्याचे निष्पन्न झाले. श्रीनगर (धारवाड) येथे सायबर कॅफे चालविणारे रविंद्र दशरथ पेंडुरे (वय 30) यांचे कुटुंबीय बेळगावात दाखल झाले. बोलेरो पिकअपमध्ये आढळलेला मृतदेह रविंद्रचा असल्याचा दावा त्यांनी केला. याच दरम्यान कटकोळ, ता. रामदुर्ग येथील एका महिलेनेही हा मृतदेह आपला मुलगा प्रकाश अय्यप्पा पडी (वय 28) याचा असल्याचा दावा केला.
साहजिकच एका मृतदेहावर दोन कुटुंबीयांनी दावा केल्यामुळे डीएनए चाचणीतून नातेवाईकांचा शोध घेण्याचे ठरले. डीएनए चाचणी अहवाल आल्यानंतर हा मृतदेह प्रकाश पडी याचा असल्याचे उघडकीस आले. त्यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख संदीप पाटील दर गुरुवारी जनता दर्शन कार्यक्रम घ्यायचे. प्रकाशच्या आईने अनेकवेळा जनता दर्शनमध्ये जाऊन, ‘आपल्या मुलाचा खून कोणी केला?’ अशी विचारणा केली.
मृतदेह कोणाचा? याचा उलगडा झाला तरी कशासाठी त्याचा खून झाला, याचे गूढ उकलले नाही. अखेर 31 डिसेंबर 2013 रोजी हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले. पोलीसप्रमुख देवराज व त्यांच्या सहकाऱयांनी तपास सुरू केला. स्थानिक पोलिसांबरोबर सीआयडी पथकाच्या मनातही एकच संशय बळावला, खून झालेल्या प्रकाशच्या नावे ऑक्टोबर 2011 मध्ये वेगवेगळय़ा कंपन्यांचे विमा उतरविलेले आहेत. केवळ एक महिन्याचा हप्ता भरण्यात आला आहे. विमा रक्कम हडपण्यासाठी हा खून केला असावा का? असा संशय बळावला व त्या दिशेने तपास सुरू झाला.
बेंगळूर येथील महिलेची भूमिका काय?
बोलेरो पिकअप हे वाहन बेंगळूर येथील रुपा या महिलेच्या नावे नोंद होते. धारवाड येथे सायबर कॅफे चालविणाऱया रविंद्रकडे प्रकाश जात होता. कारण शिक्षणासाठी धारवाड येथे त्याचे वास्तव्य होते. कामानिमित्त रविंद्रकडे येणे-जाणे होते. प्रकाशच्या परिस्थितीचा फायदा घेत त्याच्या नावे विमा उतरवून उचवडे क्रॉसजवळील डोंगरावर त्याला जिवंत जाळण्यात आले होते. नंतर हा मृतदेह रविंद्रचा असल्याचा दावा करण्यात आला होता. इथपर्यंत तपास पूर्ण झाला आहे. या खून प्रकरणात बेंगळूर येथील रुपा या महिलेची भूमिका काय आहे? याचा शोध घेतला गेला नाही. गेल्या आठ वर्षात सीआयडीने तपास पुढे का नेला नाही? या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यात आहे.









