प्रतिनिधी / सातारा :
शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) करीता दि. 5 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण यामध्ये डी.एड, बी.एड शिक्षण घेणाऱया अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मात्र परिक्षेपासुन वंचित रहावे लागत होते. यामुळे या विद्यार्थ्यांचे दोन वर्ष वाया जात होती. यामुळे संबंधीत विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आंदोलने शिक्षण विभागाला निवेदने दिली. आज अखेरीस त्यांच्या मागणीला यश आले असून यंदा डी.एड, बी.एड चे शिक्षण घेणाऱया अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना ही यंदाची टीईटी परीक्षा देण्याची अनुमती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने येत्या 10 ऑक्टोबरला टीईटी परीक्षा राज्यातील विविध केंद्रांमध्ये पार पडणार आहे. मागील काही दिवसांपुर्वी या परीक्षेकरीता अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली होती. त्यामुळे आता अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांना येत्या 5 दिवसाच्या आत या परीक्षेकरीता अर्ज करण्याचे अनिवार्य आहे.
सातारा जिल्हय़ात यंदा एकूण 389 विद्यार्थी हे डी.एडच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहेत. तर 1135 विद्यार्थी हे बी.एडच्या अंतिम वर्षात प्रवेश घेत आहेत. शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे एकूण 1524 विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्याल्या विद्यार्थ्यांना लवकरच कायमस्वरूपी शिक्षक भर्ती करूण घेण्यात येणार आहे.