दिल्ली न्यायालयात स्फोट घडविण्याचा आरोप : हँडवॉशचे केले प्राशन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात स्फोट केल्याप्रकरणी आरोपी असलेल्या डीआरडीओच्या वैज्ञानिकाने पोलीस कोठडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. शेजारी राहणाऱया वकिलाच्या हत्येच्या कटाप्रकरणी भरत भूषण कटारियाला शनिवारी अटक करण्यात आली होती. रविवारी रात्री उशिरा त्याने हँडवॉशचे प्राशन केले आहे.
बेशुद्ध अवस्थेत स्वच्छतागृहात पडलेल्या कटारियाला पोलिसांनी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले, त्यानंतर त्याला तेथून एम्समध्ये हलविण्यात आले. कटारियाने 9 डिसेंबर रोजी न्यायालयात स्फोट घडवून आणला होता. त्याच्या घरातून स्फोटक निर्मितीची सामग्रीही मिळाली होती. दिल्ली पोलिसांची विशेष शाखा याप्रकरणी चौकशी करत आहे.
दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात स्फोट होत एक इसम जखमी झाला होता. हा स्फोट रिमोट कंट्रोलद्वारे घडवून आणला गेला होता. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर जखमी वकिलाचा शेजारी भरत भूषण कटारिया देखील त्यादिवशी न्यायालयात उपस्थित होता असे आढळून आले. कटारियाने न्यायालयात एक बॅग ठेवत तिथून काढता पाय घेतला होता. कटारिया राहत असलेल्या इमारतीच्या एका मजल्यावर वकिल राहतो. 4 मजली इमारतीत लिफ्ट बसविण्यावरून त्यांच्यात 6 वर्षांपासून वैमनस्य निर्माण झाले आहे. दोघांनीही परस्परांच्या विरोधात गुन्हे नोंदविले आहेत.









