प्रतिनिधी/ बेळगाव
देशातील सर्वात मोठय़ा मेगा रेल्वे भरतीला या महिन्यापासून सुरूवात होणार आहे. एकूण 1 लाख 40 हजार 640 जागांसाठी 15 डिसेंबर पासुन भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी कॉम्प्युटर बेस टेस्ट घेतली जाणार असून, त्यासाठीची तयारी रेल्वे विभागाच्या वतीने केली जात आहे. ज्या अर्जदारांनी यासाठी अर्ज केले आहेत त्यांची कॉम्प्युटरबेस परीक्षा घेतली जाणार आहे.
भारतीय रेल्वेने फेब्रुवारी 2019 मध्ये 3 वेगवेगळय़ा वर्गातील जागांसाठी अध्यादेश काढले होते. अर्ज केलेल्यांची लेखी परीक्षा एप्रिल दरम्यान होणार होती परंतु कोरोनामुळे लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा 15 डिसेंबर पासून काँम्प्युटर बेस टेस्ट पद्धतीने घेतली जाणार आहे. यामध्ये नॉन टेक्निकल विभागासाठी 35 हजार 208 (गार्ड, ऑफिस क्लार्क) 1663 जागा (स्टेनो आणि शिक्षक) तर 1 लाख 3 हजार जागा (ट्रक मेन्टेनन्स, पॉईंटमन) यांच्या भरून घेतल्या जाणार आहेत.
एजंटांपासून सावधान
रेल्वे विभागामध्ये नोकरी लावून देतो असे सांगून युवकांची फसवणूक केली जात आहे. युवकांकडून लाखो रूपये घेऊन असे एजंट त्यांना लुबाडणूक करीत आहेत. परंतु ही पूर्णपणे कॉम्प्युटर बेस परीक्षा असून, केवळ गुणवत्तेच्या आधारे भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे अर्ज केलेल्यानी कोणत्याही एजंटांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन नैऋत्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.









