भारतीय बॅडमिंटन संघटनेचे शिखर संघटनेला अभिवचन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात 4 लाख अमेरिकन डॉलर्स बक्षीस रकमेची इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा भरवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेने मंगळवारी घोषित केले. या स्पर्धेच्या माध्यमातून ऑलिम्पिक कोटा उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे, पात्रतेच्या दृष्टीने ही स्पर्धा अनेक खेळाडूंसाठी अनन्यसाधारण महत्त्वाची असणार आहे.
जागतिक बॅडमिंटन संघटनेने मागील आठवडय़ात भारतीय बॅडमिंटन संघटनेला बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर सिरीज 500 चे आयोजन करण्याची सूचना केली. ही स्पर्धा तसेच टोकियो ऑलिम्पिक पात्रता फेरीतील काही स्पर्धा यापूर्वी कोव्हिड-19 च्या संकटामुळे लांबणीवर टाकाव्या लागल्या आहेत. याला उत्तर देताना भारतीय बॅडमिंटन संघटनेने डिसेंबर किंवा जानेवारीत ही स्पर्धा आयोजित करण्याची आपली तयारी असल्याचे कळवले. फक्त यासाठी आपल्याला केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा असल्याचे भारतीय बॅडमिंटन संघटनेचे महासचिव अजय के. सिंघानिया यांनी नमूद केले.
‘तूर्तास, आम्ही ही स्पर्धा वर्षअखेरीस घेऊ शकतो, असे आम्ही जागतिक संघटनेला कळवले आहे. अर्थातच, त्यावेळी परिस्थिती कशी असेल, यावर बरेच काही अवलंबून असेल. सप्टेंबरमध्ये स्पर्धा भरविण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. पण त्यास आम्ही असमर्थता दर्शविली होती,’ असे सिंघानियांनी सांगितले.
आम्ही सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा भरवू शकतो का, अशी विचारणा जागतिक संघटनेने आमच्याकडे केली होती आणि त्याला आम्ही असमर्थता देखील दर्शवली’, याचा सिंघानिया यांनी येथे उल्लेख केला. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, ही स्पर्धा दि. 24 ते 29 मार्च या कालावधीत नवी दिल्ली येथे होणार होती.
याशिवाय, स्विस सुपर ओपन 300 (17 ते 22 मार्च), मलेशिया ओपन सुपर 750 (31 मार्च ते 5 एप्रिल), सिंगापूर ओपन सुपर 500 (7 ते 12 मार्च) व बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप (21 ते 26 एप्रिल) या अन्य ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा देखील लांबणीवर टाकल्या गेल्या आहेत. जागतिक स्तरावर इंडोनेशिया ओपन सुपर 1000, ग्रेड 3, कनिष्ठ व पॅराबॅडमिंटन स्पर्धेला देखील कोव्हिड-19 प्रकोपाचा फटका बसला आहे.









