नोव्हेंबरच्या तुलनेत 1,749 कोटींची घट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
डिसेंबर 2021 मध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन 1 लाख 29 हजार 780 कोटी रुपये होते. नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत हे संकलन 1 हजार 749 कोटी रुपये कमी आहे. नोव्हेंबरमध्ये एकूण जीएसटी संकलन 1 लाख 31 हजार 526 कोटी रुपये होते. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन 1.30 लाख कोटी रुपये होते. डिसेंबर 2021 मध्ये सीजीएसटी 22,578 कोटी रुपये, एसजीएसटी 28,658 कोटी रुपये, आयजीएसटी 69,155 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या 37,527 कोटी रुपयांसह) आणि 9,389 कोटी रुपये अधिभाराचा (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या रु. 614 कोटींसह) समावेश असल्याची माहिती शनिवारी अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली.
अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागल्याने, करचुकवेगिरी विरोधात केलेल्या कारवाया, विशेषतः बनावट पावत्या देणाऱयांविरुद्धची कारवाई यामुळे जीएसटी संकलनात वाढ होत आहे. एप्रिल 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यापासून एप्रिल 2021 मध्ये जमा झालेले 1.41 लाख कोटी रुपयांचे संकलन आतापर्यंतचे सर्वाधिक ठरले आहे. तसेच नोव्हेंबर 2021 मध्ये (1 लाख 31 हजार 526 कोटी रु.) दुसऱया क्रमांकाचे करसंकलन झाले होते. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या जीएसटी संकलनाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2021 मध्ये एकूण जीएसटी महसूल संकलन 1 लाख 29 हजार 780 कोटी रुपये आहे. हे संकलन डिसेंबर 2020 च्या तुलनेत 13 टक्के आणि डिसेंबर 2019 मधील करसंकलनापेक्षा 26 टक्के जास्त आहे.
गेल्या पाच महिन्यातील जीएसटी संकलन
महिना संकलन (कोटीमध्ये)
ऑगस्ट 1,12,020 रु.
सप्टेंबर 1,17,071 रु.
ऑक्टोबर 1,30,127 रु.
नोव्हेंबर 1,31,526 रु.
डिसेंबर 1,29,780 रु.









