डॉ. अश्वथ नारायण यांची माहिती : कोरोना रोखण्यासाठी लस एकमात्र पर्याय
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना प्रतिबंधक लसीवरून विरोधी पक्षांनी सुरू केलेला राजकीय खेळ अत्यंत खेदजनक आहे. अशा परिस्थितीतही राज्य सरकार डिसेंबरपूर्वी 18 वर्षांवरील सर्वांना लस देणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि राज्य कोविड कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.
बेंगळूरच्या कंठीरवा स्टेडियमवर बुधवारी ऍडव्होकेट फॉर ग्रीन अर्थ या स्वयंसेवी संघटनेने बेंगळूर महापालिकेच्या सहकार्याने वकिलांसाठी आयोजिलेल्या विशेष लसीकरण अभियानाला चालना दिल्यानंतर ते बोलत होते. कोरोना विषाणू आपल्याजवळ येण्यापासून रोखण्यासाठी लस हा एकमात्र पर्याय आहे. याविषयी सुरू असलेले राजकीय षड्यंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोडून काढले आहे. त्याचप्रमाणे राज्यातही सुरू असणाऱया कारस्थानाला राज्य सरकारने समर्थपणे तोंड दिले आहे. जगातील इतर देशांशी तुलना केल्यास आपल्या देशात लसीवरील संशोधन, लसनिर्मिती आणि लसीकरण अत्यंत वेगाने झाले आहे. ही बाब प्रत्येकाने दखल घेण्यासारखी आहे. प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस द्यावी. शिवाय कुटुंबातील इतर सदस्यांना देखील मिळवून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी खासदार पी. सी. मोहन, ज्येष्ठ वकील विवेक रेड्डी, राज्याचे सॉलिसिटर जनरल नरगुंद आदी उपस्थित होते.









