सुविधेमुळे ग्राहकांच्या अडचणी कमी होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय रिझर्व्ह बँकेचे(आरबीआय)गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी मागील तीन दिवसांपासून सुरु असणाऱया आरबीआयच्या बैठकीचा समारोप करताना विविध मुद्यांची उकल केली आहे. यामध्ये आता येत्या डिसेंबरपासून 24 तासांसाठी आरटीजीएस(रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट)ची फंड ट्रान्स्फर सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली आहे.आरटीजीएसच्या सुविधेमुळे 24 तासात कधीही पैसे ट्रान्स्फर करण्याची सोय होणार आहे.
आरटीजीएसच्या आधारे 2 लाख रुपयांपेक्षा अधिकचा निधी ट्रान्स्फर करण्यासाठीची मर्यादा राहणार आहे. सध्याच्या घडीला बँकेचे कामकाज सुरु असतानाच आरटीजीएसची सुविधा वापरता येत आहे. पण डिसेंबरपासून ही सेवा 24 तास उपलब्ध होणार आहे. एका बँक खात्यामधून कोणत्याही दुसऱया बँक खात्यात पैसे इलेक्ट्रॉनिक ट्रान्स्फरच्या माध्यमातून जमा करता येणार आहेत. मोठय़ा रक्कमेची रियल टाइम पेमेंटची सुविधा देणाऱया देशांमध्ये भारताचा या उपक्रमामुळे समावेश होणार असल्याची माहिती आहे.
डिसेंबर 2019 पासून एनईएफटीची सुविधा
आरबीआयने डिसेंबर 2019 मध्ये नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्स्फरची (एनईएफटी) सुविधा सुरू केली आहे.









