सरकारी तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांची एनएसयुआय व विद्यार्थ्यांनी घेतली भेट
प्रतिनिधी /पणजी
आल्तिनो पणजी येथील सरकारी तंत्रनिकेतनचे (गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक) प्राचार्य एल. आर. फर्नांडिस यांची एनएसयुआय व तेथील विद्यार्थ्यांनी भेट घेऊन डिप्लोमा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची मागणी केली. दरम्यान त्या परीक्षा ऑनलाईन घेण्याची फाईल मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्यानंतरही तांत्रिक शिक्षण संचालकांनी ते जाहीर केले नाही म्हणून एनएसआयने त्यांचा निषेध नोंदवला आहे.
सरकारी तंत्रनिकेतनतर्फे प्राचार्यानी विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रत्यक्ष हजेरी लावून (ऑफलाईन) घेण्याचे जाहीर केले होते. यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी तांत्रिक परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे यापूर्वीच जाहीर केलेले असताना त्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची व तसे जाहीर करण्याची प्राचार्यांची कृती चुकीची आणि बेकायदेशीर असल्याचे एनएसयुआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी सांगितले.
दरम्यान परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे आश्वासन प्राचार्यांनी एनएसयुआय च्या शिष्टमंडळास दिले. या प्रकरणी तांत्रिक शिक्षण संचालकांशी बोलून सदर परीक्षा ऑनलाईन घेण्याची अधिसूचना जारी करण्याचे आश्वासनही प्राचार्यानी दिल्याचे चौधरी यांनी सांगितले. डॉ. सावंत यांनी या प्रकरणी मध्यस्थी करावी, आणि तांत्रिक शिक्षण संचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी चौधरी यांनी की आहे. डिप्लोमा विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा, आणि त्यांची चिंता वाढवून नये असे एनएसयुआयने म्हटले असून परीक्षा ऑनलाईन घेणार असल्याचे जाहीर करावे, असे सुचविले आहे.









