मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे औदासिन्याचे वाढते प्रमाण आपण सारेच पाहतो आहोत. विविध वयोगटांमध्ये डिप्रेशनचे वाढते प्रमाण विचार करायला लावणारे आहे. त्यामुळे मानसिक आरोग्याच्याबाबतीत सजग असणे फार गरजेचे आहे. औदासिन्याचे स्त्रियांमध्ये आढळणारे प्रमाण पुरुषांमधील प्रमाणाच्या दुप्पट आहे. अर्थात मासिक पाळी, गरोदरपण, बाळंतपण, रजोनिवृत्ती या साऱया टप्प्यांवर हार्मोनल चेंजेस अर्थात संप्रेरकातील बदलांमुळे औदासिन्याची लक्षणे दिसू शकतात.तसेच समाजातील दुय्यम स्थान, घर आणि नोकरी ही डबल डय़ुटी करतानाची कसरत, निर्णयस्वातंत्र्य नसणे, जीवनाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन या सर्वांची परिणितीही औदासिन्याकडे वाटचाल होण्यात होऊ शकते. अलीकडे मुलांमधेही औदासिन्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होताना दिसते आहे. घरच्यांचा अती धाकधपटशा तर काही ठिकाणी अनिर्बंध जगण्याइतके पूर्ण स्वातंत्र्य, नकार ऐकायची सवयच नसणे, शाळा-क्लास-अभ्यास-परीक्षा गुण, प्रवेश-पालकांच्या अपेक्षा, क्षमता नसताना निवडलेला अभ्यासक्रम, अफाट स्पर्धा त्यातून निर्माण होणारी खंत अशा अनेक छोटय़ा मोठय़ा कारणांमुळे डिप्रेशन आलेले पहायला मिळते.
खरंतर आलेले डिप्रेशन ज्यावेळी सौम्य प्रमाणात असते त्यावेळी केवळ समुपदेशनानेही त्यावर मात करता येते. डिप्रेशन मध्यम वा तीव्र असेल तर औषधोपचारांना पर्याय नसतो. मेंदूत उद्भवलेला जैवरासायनिक असमतोल औषधांनी घालवता येतो. काहीवेळा समुपदेशन व मानसोपचारांची जोड देऊनही समस्या सोडविण्यास मदत केली जाते.
योग, ध्यान अर्थात लक्ष देण्याचे कौशल्य विकसित करणे, विचार भावनांची सजगता यासाठी सजगतेची तंत्रे शिकविणे, वर्तन उपचारांच्या माध्यमातून इष्ट वर्तन शिकवणे आदी अनेक थेरपींची मदत घेतली जाऊ शकते. खरंतर केव्हा ना केव्हा तरी प्रत्येकाच्या आयुष्यात निराशा येत असते. आपल्या मनाची ताकद वापरूनही आपण त्यावर मात करू शकतो. परंतु त्यासाठी काही गोष्टी आवर्जून लक्षात घेणे आणि त्याबाबत सुरुवातीपासूनच प्रत्येकानेच सजग असणे गरजेचे आहे. आपण आपल्या शरीराची काळजी घेतो. ते सुंदर रहावे म्हणून धडपडतो. तसेच मन सुंदर रहावे, निरोगी रहावे म्हणून प्रत्येकाने दररोज मनाच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. डिप्रेशनमधे आढळणाऱया मुख्य तीन भावना-
होपलेसनेस- अगदी निराश वाटणे, कशातच काही रस न वाटणे.
हेल्पलेसनेस-हतबलता जाणवणे.
वर्थलेसनेस- स्वतःची काही किंमत नाही असे वाटणे.
सामान्यतः डिप्रेशनची आढळणारी लक्षणे-
उदास भावना हा या मनोवृत्तीचा केंद्रबिंदू आहे. बऱयाचदा निराश वा उदास वाटणे, आत्मविश्वास ढळणे, कमीपणा वाटणे. मनोरंजनाचा आस्वाद न घेता येणे, नीरस वाटणे. उदास मूड सोबतच चिडचिड, काळजी, अनाठायी चिंता, क्वचित मंत्रचळेपणा (ऑबसेशन) ही लक्षणेदेखील आढळतात. निद्रानाश, शारीरिक हालचाली मंदावणे.
भूक कमी लागणे वा अती लागणे. सतत थकवा वाटणे. एकाग्रता कमी होणे, चटकन निर्णय न घेता येणे. स्वतःबद्दल कमीपणाची, हीनपणाची, अपराधीपणाची भावना वाटणे. आत्महत्येचा विचार किंवा प्रयत्न. काही वेळा सतत डोकेदुखी, पोटदुखी अशा शारीरिक तक्रारी जाणवतात पण त्यामागे नैराश्य दडलेले असू शकते. काही रुग्णांना अशा नैराश्याबरोबर कानांमध्ये आवाजाचे भास होणे, भास भ्रमाची लक्षणेही आढळू शकतात. ही लक्षणे ‘सायकॉटिक’ म्हणजे वास्तवाशी सुसंगत नसतात. या प्रकाराला सायकॉटिक डिप्रेशन असेही म्हणतात. (हा डिप्रेशनचा प्रकार अधिक तीव्र असतो. आत्महत्येचा धोका अधिक असतो)
काही गैरसमज-
सुख बोचते म्हणून डिप्रेशन येते. डिप्रेशन हा एक मानसिक आजार आहे हे लक्षात घ्यायला हवे. जसे आपण शारीरिक आजारावर त्याच्या तीव्रतेनुसार उपचार करतो तसेच त्याच्या तीव्रतेनुसार त्या त्या पद्धतीने यावरही उपचार घ्यावे लागतात. एकदा डॉक्टरांकडे गेले की आयुष्यभर औषधे पाठ सोडत नाहीत. बहुतांशवेळा समुपदेशन आणि सौम्य स्वरुपाचा उपचार नीट घेतल्यास सहा महिन्यात यातून बाहेर पडता येऊ शकते. गर्जेल तो पडेल काय.. याप्रकारे आत्महत्येचा इशारा देणारा माणूस कधीच आत्महत्या करत नाही खरंतर ज्यावेळी असे एखादी व्यक्ती बोलत असेल त्यावेळी दुर्लक्ष न करता तिच्या मनातली खळबळ समजून घेणे. मी आहे हा आश्वस्त भाव निर्माण करणे आणि त्या तीव्रतेनुसार तिला उपचारांसाठी तयार करणे गरजेचे आहे.
डिप्रेशनच्या दिशेने वाटचाल होऊ नये म्हणून खबरदारीचे उपाय-
अशी भावनिक मोजपट्टी आपणच तयार करायची. यातील शून्य ही स्थिती (वाईटही नाही आणि चांगलेही नाही) अर्थात समतोल स्थिती दर्शविते. यातील अधिक अंकाची बाजू ही किती चांगले वाटते आहे याकडे जाणारी आणि वजा अंकाची बाजू ही नकारात्मक विचार-भावना येणे, उदास वाटणे या गोष्टी दर्शविणारी आहे. अशी मोजपट्टी तयार करून रोज मनात डोकावून पहायचे आणि आपली तुलना आपल्यासोबतच करायची. नोंद करायची.
कधीतरी उदास वाटणे, मूड नसणे, काही नकारात्मक भावना विचार येणे हे अगदी नैसर्गिक आहे. म्हणजेच त्याची तीव्रता पाहता -1, -2 ही स्केल नैसर्गिक आहे. उदा. कोरोनामुळे वाटणारी काळजी ही स्वाभाविक आहे. मलाही कोरोना होईल का हा विचार मनात येतो. आपण समजा -1 या पट्टीवर आहोत.. ओके. परंतु त्या विचाराची, काळजीच्या भावनेची तीव्रता, वारंवारता, कालावधी हे वाढत जात नाही ना याकडे लक्ष हवे. म्हणजे मला कोरोना होईल का हा विचार वारंवार मनात यायला लागला आणि त्याचे चिंतेत रूपांतर होऊ लागले तर आपण -3, -4 या स्केलवर जातो आहोत. ते कमी करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याची जाणीव आणि वेळीच घेतलेली खबरदारी यामुळे सतत वजा बाजूला राहणे म्हणजेच औदासिन्याच्या दिशेने होणारा प्रवास टाळता येईल. ताणाचे प्रमाण योग्य हवे. जर आपल्याला अजिबातच काळजी वाटली तर बेफिकिरीच्या दिशेने आपला प्रवास सुरू होईल त्यामुळे गतीसाठी योग्य प्रमाणात ताण आवश्यक आहे. परंतु त्याचे प्रमाण वाढत नाही ना, याकडे या भावनिक मोजपट्टीद्वारे आपण लक्ष ठेवू शकतो. याविषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या लेखात.
Ad. सुमेधा देसाई, मो.94226 11583