डिप्रेशन..
सध्याच्या काळात मानसिक आरोग्याचे प्रश्न ऐरणीवरती आहेत. वेगवेगळय़ा वयोगटांमध्ये उद्भवणाऱया विविध समस्या आपण पाहतोच आहोत. आत्महत्यांचे वाढते प्रमाण, डिप्रेशनच्या केसेस यात होणारी वाढ पाहता मानसिक आणि भावनिक आरोग्याच्या दृष्टीने सजग असणे फार गरजेचे आहे. शारीरिक सुदृढतेबाबत बोलायचे तर वजन, उंची, काम करण्याची क्षमता अशा मोजमापांच्या आधारे आपण शारीरिक आरोग्य मोजत असतो. तसेच मानसिक आरोग्याच्या दृष्टीने व्यक्तीच्या स्वभावाच्या विविध पैलुंचे निरीक्षण आवश्यक असते. शारीरिक सुदृढता म्हटली की आपल्या डोळय़ासमोर पटकन् हनुमान वा भीमासारखी बलवान शरीरयष्टी येते परंतु निरोगी वा सुदृढ असण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला तेवढे बलवान असण्याची गरज असते का? याचे उत्तर आहे-नाही. तसेच निरोगी मन वा सुदृढ मन याचा अर्थ एखाद्या व्यक्तीमध्ये, स्वभावामध्ये एकही दोष नसणे, ती व्यक्ती सर्वगुणसंपन्न असणे असा नाही. व्यक्तीमध्ये त्रुटी, दोष असतातच परंतु त्याची योग्य जाणीव आणि सुधारणेच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न ही गोष्ट मात्र सुदृढ मानसिक आरोग्याच्या दिशेने नेणारी आहे.
एकविसावे शतक त्यातील समोर उभी ठाकलेली कोरोनासारखी अनेक आव्हाने पाहता मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आपण सर्वांनीच सजग असणे गरजेचे आहे. डिप्रेशनच्या उंबरठय़ावर असतानाच योग्य काळजी घेतली गेली तर भविष्यात उद्भवणाऱया अनेक समस्या, धोके टाळता येतात.
‘त्याचे ना कशातच लक्ष लागत नाही, जीवनातले रंग अगदी उडाल्यासारखे वाटतात त्याला.. नक्कीच डिप्रेशन असणार’ असे आपण अगदी सहजतेने म्हणतो. परंतु डिप्रेशन म्हणजे काय? त्याचे प्रकार, कारणे, आपल्याला काय करता येऊ शकते याचा अगदी थोडक्मयात आढावा आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत.
डिप्रेशन-
उदासीनता वा औदासिन्य हा मनोविकार आहे. अनेकदा औदासिन्य (डिप्रेशन) आणि नैराश्य (फ्रस्टेशन) या दोन संज्ञा बरेचजण एकाच अर्थाने वापरतात. वस्तुतः या दोन्ही संज्ञा भावनांशी निगडित असल्यातरी त्यांच्या तीव्रतेमध्ये फरक आहे. फ्रस्ट्रेशन म्हणजे अपेक्षाभंगामुळे आलेले वैफल्य वा नैराश्य तर डिप्रेशन म्हणजे टोकाचे औदासिन्य. फ्रस्टेशन ही डिप्रेशनची पहिली पायरी आहे.
मानसिकदृष्टय़ा सामान्य वर्तन आणि अपसामान्य (ऍबर्नार्मल) वर्तन कोणते हे ठरवणारी सीमारेषा स्पष्ट नसली तरी मनोविकाराकडे वाटचाल करणाऱया व्यक्तीची काही वैशिष्टय़े सांगता येतील.
1. व्यक्तीला मानसिक क्लेश असणे.
2. कार्यक्षमता कमी होणे
3. स्व नियंत्रण कमी होणे
4. असमर्थता/दुबळेपणा निर्माण होणे.
खरंतर औदासिन्याचा विकार लहानांपासून मोठय़ांपर्यंत कोणालाही आणि केव्हाही जडू शकतो. या विकाराची लक्षणे अनेक आहेत. शारीरिक आहेत तशी भावनांशी आणि वर्तणुकीशीही निगडित आहेत. अगदी ढोबळमानाने त्याचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे-
शारीरिक लक्षणे-
लवकर झोप न लागणे, सकाळी उठल्यावर झोप लागल्याचे समाधान न मिळणे, सतत झोपमोड होणे, अती झोप येणे, थकवा जाणवत राहणे, वजन वाढणे वा घटणे, अती भूक लागणे वा भूक मंदावणे, अकारण पाठ, डोके वा पोट दुखणे, अपचन, मरगळ इ.
वर्तनाशी निगडित लक्षणे-
गती, लय मंदावणे, निर्णयक्षमता कमी होणे, कार्यक्षमता घटणे, जबाबदाऱया, कपडे, नेटकेपणा स्वतःच्या दिसण्याकडे दुर्लक्ष होणे, लैंगिक इच्छा कमी होणे, कुटुंबीय, मित्र यांच्याबद्दल आस्था न वाटणे, कशातही मन न रमणे इ.
भावनिकतेशी निगडित लक्षणे-
सतत चिडचिड, एकाग्रता न साधता येणे, हताशपणा, अपराधीपणाची भावना वाढीस लागणे, चिंताग्रस्त वा निर्विकार असणे, निराशा, असाहयता, सतत उदासी या गर्तेत फिरत राहणे, टोकाचे नकारात्मक विचार वा आत्महत्येचा प्रयत्न करणे. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. अनेक मानसिक विकारांच्या लक्षणांमध्ये खूप साम्य असते. बऱयाचदा ती ओव्हरलॅप करणारी असतात त्यामुळे आपण स्वतःच त्याचे थेट निदान न करता मानसोपचार तज्ञांची मदत घेणे हितावह ठरते. आपल्याला एखाद्या व्यक्तीत अशी लक्षणे आढळल्यास संवादाच्या माध्यमातून तिला आधार देत योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेण्यासाठी तयार करणे आवश्यक आहे.
डिप्रेशनचे प्रकार-
डिस्थायमिया-(सौम्य औदासिन्य)
या प्रकारामध्ये पीडित व्यक्तीला सौम्य प्रमाणात उदास वाटत राहते. उदासीन वाटण्याचा हा कालावधी दोन वर्षांपर्यंतचा असू शकतो. मनावर नुसते दडपण असेल तरी ती व्यक्ती नित्याचे व्यवहार सुरळीतपणे पार पाडते. परंतु या औदासिन्यामुळे त्या व्यक्तीच्या कामावर, नातेसंबंधावर, समायोजन क्षमतेवर परिणाम होऊ लागतो.
मेजर डिप्रेशन-(तीव्र औदासिन्य)
उदासीनतेची लक्षणे तीव्र असतात आणि दीर्घकाळ टिकतात. दैनंदिन कामावर परिणाम होतो. तीव्र औदासिन्याचे झटके येत राहतात.
मिक्स्ड एन्झायटी डिप्रेशन-
औदासिन्यासोबतच चिंता, भीती, बेचैन वाटणे, हातापायांची थरथर, कमालीची अस्वस्थता ही लक्षणे या प्रकारात दिसतात.
बायपोलर डिप्रेशन-(द्विमनावस्था औदासिन्य)
या औदासिन्याच्या प्रकारात रुग्ण आलटून पालटून उत्तेजितता किंवा उदासीनता अशा दोन भिन्न अवस्थांमधून जातो.
पहिल्या अवस्थेत क्रियाशीलता खूपच वाढते ती अवस्था संपली की, काही काळ सामान्य व्यक्तीप्रमाणे वागणे होते नंतर परत तो नैराश्याच्या गर्तेत जातो. हे चक्र सुरुच राहते.
खरंतर प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही टप्पे येत असतात की त्या दिवसात मन खिन्न होते, आयुष्यातील रंग फिके पडल्यासारखे भासू लागतात. अपयश, अपेक्षाभंग, मानहानी, विश्वासघात, ताटातूट असे छोटे मोठे प्रसंग आनंदावर विरजण पाडत असतात. जसजसा काळ जाईल तसे दु:खाची जखम भरून येते. परंतु डिप्रेशनमध्ये या जखमा सतत चिघळत राहतात. अनेकदा कुठली विशेष घटना औदासीन्याला कारणीभूत आहे, असेही दिसत नाही. जसे चिंता व भीती या विकृतीमध्ये क्षुल्लक कारणावरून किंवा कारणाशिवाय माणूस ज्याप्रमाणे भयभीत वा चिंताक्रांत होऊ लागतो, तसेच काहीसे डिप्रेशन या विकारात होते. स्वाभाविक दु:ख व विकृत औदासिन्य यामधील फरक कधी ठळक, तर कधी पुसट असतो. अर्थात याविषयी आपण अधिक जाणून घेणारच आहोत, परंतु पुढच्या लेखात!
Ad. सुमेधा देसाई, मो.94226 11583








