चिरंतन शवदाहिनी कंपनीच्या तज्ञांनी केली पाहणी : महानगरपालिकेच्या आयुक्तांना नवीन प्रस्ताव सादर
प्रतिनिधी / बेळगाव
पर्यावरणपूरक आणि कमी खर्चात अंत्यविधी करण्यासाठी महापालिकेने डिझेलवर चालणारी शवदाहिनी बसविली आहे. मात्र, सदर शवदाहिनीद्वारे अंत्यविधीकरिता 60 लिटर डिझेल आणि 4 तासांचा अवधी लागत आहे. त्यामुळे शवदाहिनीचे रुपांतर गॅसवर चालणाऱया शवदाहिनीमध्ये करण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता प्रस्ताव देण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी शवदाहिनी तज्ञांना केली आहे.
डिझेलवर चालणारी शवदाहिनी बसविण्यात आली. पण सदर शवदाहिनी मनपासाठी पांढरा हत्ती ठरली आहे. शवदाहिनीची उभारणी व्यवस्थित झाली नसल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अंत्यविधीसाठी इंधन आणि वेळ जास्त लागत आहे. परिणामी महापालिकेला ही डिझेल शवदाहिनी खर्चिक ठरत आहे. त्यामुळे डिझेलवर चालणाऱया शवदाहिनीचे गॅसवर चालणाऱया शवदाहिनीमध्ये रुपांतर करण्याचा विचार महापालिकेने चालविला आहे. त्यामुळे ठाणे येथील चिरंतन शवदाहिनी कंपनीच्या तज्ञांनी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांना संपर्क साधून शवदाहिनीचे रुपांतर गॅस शवदाहिनीमध्ये करण्याची तयारी दर्शविली आहे.
सदाशिवनगर येथे बसविण्यात आलेल्या डिझेल शवदाहिनीची पाहणी चिरंतन शवदाहिनीच्या तज्ञांनी बुधवारी केली. महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्याशी चर्चा केली. डिझेल शवदाहिनीची बांधणी चुकीची झाली असून यामध्ये खूप त्रुटी आहेत. त्यामुळेच इंधन जास्त जळत आहे. यामध्ये काही बदल करावे लागणार असल्याची माहिती चिरंतन शवदाहिनीच्या तज्ञांनी आरोग्य अधिकाऱयांना दिली.
त्यानंतर आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ आणि चिरंतन शवदाहिनीच्या तज्ञांनी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांची भेट घेतली. डिझेल शवदाहिनीच्या दुरुस्तीबाबत चर्चा करून या शवदाहिनीमध्ये बदल करण्याची गरज असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे यामध्ये बदल करून गॅसवर चालणारी शवदाहिनी सुरू करता येऊ शकते. गॅसवर चालणाऱया शवदाहिनीद्वारे एका अंत्यविधीसाठी तासाचा अवधी व 19 किलो गॅसची आवश्यकता आहे. सध्या शहरात पाईपलाईनद्वारा गॅस पुरवठा करण्यात येत आहे. या गॅसचा उपयोग केल्यास कमी खर्चात अंत्यविधी होऊ शकतो. गॅसवर चालणाऱया शवदाहिनीद्वारे एका अंत्यविधीस हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विविध ठिकाणी गॅसवरील शवदाहिन्या बसविल्याची माहिती चिरंतन शवदाहिनीचे तज्ञ अच्युत दामले यांनी महापालिका आयुक्तांना सादर केली. त्यामुळे सदर डिझेल वाहिनी गॅसवर चालणारी बनविण्यासाठी प्रस्ताव आणि खर्चाचा तपशील देण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी केली.









