नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी जारी केलेल्या दरानुसार, डिझेलच्या किमतीत 20 ते 22 पैशांची वाढ करण्यात आली आहे. याचदरम्यान पेट्रोलचे दर मात्र स्थिर आहेत. मुंबईत डिझेलची किंमत दरवाढीनंतर 96.19 रुपये प्रतिलिटरवरून 96.41 रुपये प्रतिलिटर इतकी झाली आहे. तर दिल्लीत डिझेल 88.62 रुपये प्रतिलिटरवरुन 88.82 रुपये प्रतिलिटर झाले आहे.
देशात डिझेलचे दर शुक्रवारी 24 सप्टेंबर रोजी दोन महिन्यांहून अधिक काळाने पुन्हा एकदा वाढले आहेत. यापूर्वी 15 जुलै 2021 रोजी डिझेलच्या दरांत वाढ झाली होती. तेव्हा पेट्रोल 15 पैशांनी महागले होते. मात्र त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ झालेली नव्हती. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंधनाच्या दरांत किंचित घट नोंद झाली होती.









