वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) डिजिटल लॉकर प्लॅटफॉर्म आणि डिजिटल डॉक्यूमेंट्सला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता वैयक्तिक कागदपत्रे ऑनलाईन करण्याबरोबरच गरज पडल्यास केवायसीसाठीही त्याचा वापर करता येणार आहे. ग्राहकांच्या डिजिलॉकर खात्यातील प्राधिकरणाद्वारे जारी केलेल्या ई-कागदपत्रांना आता केवायसी प्रक्रियेत स्वीकारण्यात यावीत, असे आरबीआयने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
डिजिलॉकर हे एक आभासी लॉकर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते जुलै 2015 मध्ये याचे सादरीकरण करण्यात आले होते. 2017 मध्ये यासंबंधी नियमांची सूची तयार करण्यात आली होती. एकदा लॉकरमध्ये आपली कागदपत्रे समाविष्ट केल्यानंतर त्यांनी सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.