पंतप्रधान मोदींचे ‘व्हिवा टेक’मध्ये प्रतिपादन, भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘को-विन’ या मोबाईल ऍपचे कोरोनाशी संघर्षात मोलाचे साहाय्य झाले आहे. डिजिटल क्रांतीमुळे संपर्क वेगवान आणि सुलभ झाल्याने कोरोनावर नियंत्रण ठेवणे साध्य झाले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आयोजित ‘व्हिवा टेक’ या कार्यक्रमात बोलताना केले. या कार्यक्रमाला जगभरातील डिजिटल क्षेत्रातील मान्यवर तसेच युरोपियन देशांमधील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. भारताला विशेष अतिथी म्हणून निमंत्रण होते. टीम कुक, मार्क झुकरबर्ग ब्रॅड स्मिथ यांचाही सहभाग या कार्यक्रमात होता.
भारतात उद्योग व्यवसायांसाठी अनूकुल वातावरण असल्याने येथे जगभरातील माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्रांमधील कंपन्यांनी गुंतवणूक करावी, असे आवाहनही त्यांनी केले. यांनी या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना अनेक महत्वाच्या मुद्दय़ांचा उहापोह केला.
पाच स्तंभांचा आधार
भारताने उद्योग आणि व्यवसायांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी पाच स्तंभांचा आधार घेतला आहे. प्रज्ञा (टॅलेंट), बाजारपेठ (मार्केट), भांडवल (कॅपिटल), अनुकूलता (इको सिस्टिम) आणि उदारमतवादी संस्कृती (कल्चर ऑफ ओपननेस) हे ते पाच स्तंभ आहेत. याच आधारावर भारत जगातील मान्यवर गुंतवणूकदारांना मोठय़ा प्रमाणात गुंतवणुकीचे आवाहन करीत आहे, असे प्रतिपादन त्यांनी या कार्यक्रमात मान्यवरांसमोर केले.
स्टार्टअप संस्कृती
भारताने गेल्या काही वर्षांमध्ये स्टार्टअप कंपन्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात नाव कमावले आहे. अनेक नव्या कंपन्या भारतात आल्या आहेत. स्टार्टअप कंपन्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि सामाजिक व्यवस्थेच्या प्रगतीलाही हातभार लावला आहे. जेथे जुनाट व्यवस्था अपयशी ठरते तेथे नवतंत्रज्ञान आणि कल्पकता यशस्वी ठरते, हे आम्ही दाखवून दिले. आमच्या प्रगतीत कोरोनाच्या उदेकामुळे काहीकाळ संकट निर्माण झाले. तथापि, अशा प्रकारच्या पुढील आव्हानांना स्वीकारण्यासाठी आम्ही स्वतःला अधिक योग्य प्रकारे सज्ज केले आहे. त्यामुळे भारतात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण असून जगातील मान्यवर कंपन्या आणि गुंतवणूकदारांनी याचा लाभ उठवावा, असे प्रतिपादन त्यांनी केले.
रिपेअर अँड प्रिपेअर कोरोना उदेकामुळे अर्थव्यवस्था मंदावली. तथापि, आता रिपेअर आणि प्रिपेअर या सूत्राचा अवलंब करून पुढील आव्हाने स्वीकारण्यास आम्ही सज्ज होत आहोत. देशभरात आरोग्य व्यवस्था अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. देशाला यंदा अनेक दशकांमधल्या सर्वात मोठय़ा अर्थिक आकुंचनाला तोंड द्यावे लागले. तथापि, आर्थिक सुधारणा प्रक्रिया सुरू आहे आणि हानी भरून काढून देश आर्थिक भरारी घेण्यास सज्ज होत आहे, असाही आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.









