प्रतिनिधी /डिचोली
डिचोली सरकारी कर्मचारी सहकारी पथसंस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असून चालू आर्थिक वर्षात संस्थेला 70 लाख 68 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष भिवा दत्ता मळीक यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.
संस्थेची वार्षिक आमसभा नुकतीच डिचोली येथील शिरोडकर सभागृहात झाली.या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून दि गोवा राज्य सहकारी संघ मर्यादित पणजीचे अध्यक्ष श्रीकांत पी.नाईक,हिशेब तपासणीस प्रदीप लाड,निवृत्त सभासद रमेश राऊत, उपाध्यक्ष सौ.संगीता पर्येकर,संचालक सूर्याजीराव राणे,पांडुरंग गावस,शिवानंद नाईक गावकर,सुनील राणे,सुनील नाईक,विश्वास परब,मनोहर परवार,दीपाली गावस व रचना पिळगावकर आदी उपस्थित होते.
अध्यक्ष भिवा मळीक यांनी संस्थेच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच 14.23 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेला सतत तीन वर्षे विविध खास पारितोषिके मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व यापुढेही असेच सहकार्य मिळू दे असे आवाहन केले.तसेच संस्थेला 30 वर्षे पूर्ण झाल्यामुळे 1200 सभासदांना संस्थेतर्फे चांगल्या दर्जाच्या मनगटी घडल्याचे वितरण करण्यात आल्याचे सांगितले.
प्रमुख पाहुणे श्रीकांत नाईक व इतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन यावेळी गौरविण्यात आले.तसेच शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या 42 सभासदांचा सत्कार करण्यात आला.श्री.नाईक यांनी संस्थेच्या प्रगतीविषयी अभिनंदन करून मुलांच्या भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या. हिशोब तपासणीस प्रदीप लाड यांनी विचार व्यक्त केले.उपाध्यक्ष सौ.संगीता पर्येकर यांनी सूत्रसंचालन केले व पांडुरंग गावस यांनी आभार मानले.









